

पुढारी ऑनलाईन डेस्क : नियमित चालणे हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे, हे आजवरच्या अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच चालणे हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार मानला जातो. निरोगी राहण्यासाठी दररोज १० हजार पावले चालावे, असेही संशोधनात स्पष्ट झाले आहे. ( Walking for health ) तुम्ही किती वेगाने चालता यावर तुम्हाला चालण्याच्या व्यायामाचे अधिक फायदे मिळतात, असे युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कमधील संशोधनात आढळले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कमध्ये वेगाने चालण्यावर संशोधन करण्यात आले. यामध्ये ४० ते ७० वयोगटातील ७८ हजार ५०० व्यक्तींनी सहभाग घेतला. संशोधनात सहभागी झालेल्या ७८हजार ५०० जणांनी एका आठवड्यासाठी २४ तास घालण्यायोग्य ट्रॅकर वापरला. त्यानंतर सात वर्षांनी संशोधकांनी त्यांच्या आरोग्यावरील परिणाम पाहिले. तेव्हा वेगाने चालणारे हे संथ चालणार्यांपेक्षा निरोगी असल्याचे आढळले.
दररोज जी व्यक्ती १० हजार पावले चालते तिचा स्मृतिभ्रंश होण्याचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो. वेगाने चालणे हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, असे सिडनी विद्यापीठातील चार्ल्स पर्किन्स सेंटर आणि फॅकल्टी ऑफ मेडिसिन अँड हेल्थ डॉ. मॅथ्यू अहमदी यांनी म्हटले आहे. निरोगी आरोग्यासाठी दररोज चालण्याचा व्यायाम फायदेशीर ठरतो. दररोज किमान ३ हजार ८०० पावले चालले तरी स्मृतिभ्रंशाचा धोका २५ टक्क्यांनी कमी होतो. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार व कर्करोग याची जोखीम आठ ते 11 टक्क्यांनी घटल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
संशोधनात सहभागी झालेले सलग ३० मिनिटे वेगाने चालले. यावेळी २० टक्क्यांना दिवसाला १० हजार पावले चालण्या एवढाच फायदा झाल्याचे दिसले. दररोज १० हजार पावले चालणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही दररोज ३० मिनिटे वेगाने चालला तर तुम्हाला १० हजार पावले चालण्या एवढा फायदा होवू शकतो, प्रत्येकाने आपल्या शरीरला शक्य असेल तेवढे वेगाने चालावे आणि एक आठवडा, एक महिना, एक वर्षानंतर व्यायाम आपल्या शरीरात कसा बदल होतो ते पहावे, असेही डॉ. मॅथ्यू अहमदी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :