

पुढारी ऑनलाईन : वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे आज ४९ व्या वर्षी निधन झाले. याबाबतची माहिती आज त्यांच्या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गेल्या आठवड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पडून त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता आणि रविवारी त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि मुलगी परिशा असा परिवार आहे.
संबंधित बातम्या
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी पराग देसाई यांच्यावर त्यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका करुन घेताना ते पडले होते. या दरम्यान त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. सुरक्षा रक्षकाने याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांना तत्त्काळ उपचारासाठी शाल्बी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना झायडस रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी हलवण्यात आले होते.
सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील खासगी रुग्णालयात देसाई यांनी अखरेचा श्वास घेतला, असे टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
पराग देसाई हे वाघ बकरी टी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रासेश देसाई यांचे पुत्र होते. ३० वर्षांहून अधिक काळात देसाई यांनी कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. या कंपनीची उलाढाल १,५०० कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच देसाई हे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचा (CII) भाग होते.
वाघ बकरी वेबसाइटवर देसाई यांचा उल्लेख "एक टी टेस्टर एक्सर्प्ट आणि मूल्यमापनकर्ता" असे केले आहे. त्यांनी अमेरिकेतील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधून एमबीए शिक्षण घेतले आहे.
हे ही वाचा :