Onion News : कांदा दरावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष | पुढारी

Onion News : कांदा दरावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा ; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सहा ऑक्टोबरला झालेल्या त्रैमासिक बैठकीत कांदा दर आणि उत्पादन यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले.

केंद्र सरकार कांदा दराबाबत इतक्या मोठ्या प्रमाणात दबावात का येतो ? असा प्रश्न व्यापारी वर्गासह शेतकरी वर्गाला पडलेला आहे. कांद्याने भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीने निवडणुकीचे निकाल पालटण्याची क्षमता आहे. भारत हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे आणि बांगलादेश, मलेशिया आणि यूएईसारख्या देशांना मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करतो. २०२२-२३ मध्ये देशाला कांदा निर्यातीतून ४५२२ कोटींचे परकीय चलन मिळाले होते. इतर कोणत्याही शेतमालालापेक्षा कांदा भाव वाढले की, त्याची चर्चा सगळीकडे पसरते. यामुळे कांद्याबाबत कुठलेही सरकार असो ते जास्त संवेदनशील असते.

देशासह जगाला कांदा पुरवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा आवक निम्याने घटली आहे. या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने नवीन लाल कांदा अजूनही अल्प प्रमाणात विक्रीस येत आहे. खरीप पिकाची स्थानिक बाजारपेठेत आवक कमी झाल्याच्या चिंतेमुळे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घाऊक कांद्याचे भाव आठवडाभरात जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

१९९८ मध्ये कांद्याचे भाव ५० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. या वाढत्या किमतींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच झटका बसत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पून्हा भाजपला सत्तेत परतता आले नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांना कांदा म्हटले की डोळ्यातुन अश्रू निघतात.

नाशिक जिल्ह्यात कांद्याची आवक घटल्याने तसेच मध्यप्रदेशमधील कांदा संपुष्टात आल्याने येत्या काही दिवसांमध्ये कांदा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापाऱ्यांना भारत केव्हाही कांदा निर्यात बंदी करू शकतो, याची भीती असल्याने तिथून कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कांदा भाव खाऊ शकतो.

-विकाससिंग, कांदा निर्यातदार, नाशिक

 

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यांचा कोट्यवधी क्विंटल कांदा हा मातीमोल भावाने विकलेला आहे. आता जरी भाववाढ दिसत असली तरी त्याचा काहीही फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने शेतकरी विरोधात कुठलाही निर्णय घेऊ नये.

निवृत्ती न्याहारकर, शेतकरी, वाहेगाव

हेही वाचा :

Back to top button