लंडनः रुबिक्स क्यूब सोडवण्याबाबत देश-विदेशात अनेक प्रकारचे विक्रम झालेले आहेत. आता कोलंबियामधील एका तरुणाने तीन रुबिक्स क्यूब हवेत उडवत एकाच वेळी सोडवण्याचा अनोखा विक्रम केला आहे. एंजेल अल्वाराडो या 19 वर्षांच्या तरुणाने केवळ 4 मिनिटे 31 सेकंदांमध्ये हवेत उडवून या क्यूब्स सॉल्व्ह केल्या. याबाबत त्याच्या नावाची नोंद आता गिनिज बुकमध्ये करण्यात आली आहे.
पाण्यात बसून रुबिक्स क्यूब सोडवणे, स्कायडायव्हिंग करीत रुबिक्स पिरॅमिड सोडवणे अशा स्वरूपाचे अनेक विक्रम यापूर्वी झालेले आहेत. एंजेलने रुबिक्स क्यूब सोडवण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला. अशी क्यूब हवेत उडवतच ती सोडवण्याचे कौशल्य त्याने मिळवले व हा विक्रम केला. यापूर्वीचाही असा विक्रम एंजेलच्याच नावावर होता. एंजेलने मे 2021 मध्ये 4 मिनिटे 52.43 सेकंदांमध्ये असा विक्रम केला होता.
एक रुबिक्स क्यूब हवेत उडवून सोडवण्यासाठी त्याने पाच महिने सराव केला होता. तीन रुबिक्स क्यूब एकाच वेळी हवेत उडवत सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा चार महिने सराव करावा लागला. कोरोना लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या फावल्या वेळेचा त्याने यासाठी भरपूर वापर केला. दोन वर्षे कठोर मेहनत घेऊन त्याने यामध्ये वेग आणला आणि विश्वविक्रम केला.
हेही वाचलंत का?