सिंधुदुर्ग : सतरा वाघनखांसह बिबट्याचे अवशेष जप्त; कातडे तस्करी प्रकरण

सिंधुदुर्ग : सतरा वाघनखांसह बिबट्याचे अवशेष जप्त; कातडे तस्करी प्रकरण

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन प्रमुख सूत्रधारांपैकी वामन शिवाजी देवळेकर (वय 43, रा. महाळुंगे-देवगड) याला घेऊन कणकवली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह पथकाने बुधवारी दिवसभर महाळुंगे येथील जंगलमय भागात ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली होती त्या भागात जाऊन पंचनामा केला.

फासकीत अडकलेल्या बिबट्याची वामन देवळेकरसह तिघांनी भाल्याने शिकार केली होती. या बिबट्याची जंगलात लपवून ठेवलेली सतरा वाघ नखे, हाडे आदी अवशेषांसह शिकारीसाठी वापरलेला भाला, अ‍ॅल्युमिनिअम तारेची फासकी, कोयता, छोटा सुरा आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले.

बिबटया कातडी तस्करी प्रकरणात सुरुवातीला तीन संशयितांना अटक करण्यात आली होती तर मंगळवारी पहाटे बिबटयाच्या शिकारीतील प्रमुख सूत्रधार वामन शिवाजी देवळेकर (43), जयसिंग पांडूरंग नवले (46) आणि राकेश पांडुरंग नवले (36,सर्व रा.महाळुंगे) या तिघांना अटक केली होती. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. या तिघांपैकी वामन देवळेकर या प्रमुख सुत्रधाराला घेवून तपासी अधिकारी अनिल हाडळ, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, पांडूरंग पांढरे यांनी बुधवारी महाळुंगेत जावून नदी किनारच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी फासकी लावून बिबट्याची शिकार झाली होती तो परिसर तसेच कातडी कोठे सोलली? नखे व अन्य अवशेष कोठे ठेवले होते? तो परिसर पिंजून काढला.

या तपासा दरम्यान वामन देवळेकर याने जंगलात बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याची लपवून ठेवलेली सतरा वाघ नखे, हाडे, पोलिसांच्या ताब्यात दिली. तसेच शिकारीसाठी वापरलेला भाला,फासकीची तार व अन्य साहित्यही पोलिसांकडे दिले. पाच ते सात महिन्यांपूर्वी वामन देवळेकर, जयसिंग नवले आणि राकेश नवले या तिघांनी फासकीत अडकलेल्या बिबट्याची शिकार केली होती. त्यानंतर बिबटयाचे कातडे काढले. नखे काढली आणि हे सर्व अवशेष विक्रीच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवले होते. तर या प्रकरणात यापूर्वी अटक केलेले सुभाष तावडे (रा. ओझरम), प्रकाश देवळेकर , संजय घाडीगावकर (रा. महाळुंगे) यांचा सहभाग कातडीच्या विक्री व्यवहारात होता. पोलिसांनी बिबटयाच्या शिकार प्रकरणी सर्व माहिती संशयित आरोपीकडून घेत अवशेष जप्त केले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news