हाँगकाँग : कोरोना संक्रमणाच्या लक्षणांमध्ये आता डोळ्यांमधील कोरडेपणा तसेच धुरकट दिसणे अशा समस्याही दिसून येत आहेत. अलीकडेच चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी एका संशोधनात म्हटले आहे की, कोरोनाशी झुंज दिलेल्या 20 टक्के लोकांना 'ड्राय आइज'च्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे.
संशोधकांनी कोरोनातून बरे झालेल्या 228 रुग्णांची एक ते तीन महिने पाहणी केली. या रुग्णांच्या हेल्थ रेकॉर्डस्ची तुलना 109 निरोगी लोकांशी केली. त्यामध्ये आढळले की, कोरोनाच्या विळख्यात अडकणार्या प्रत्येक पाचपैकी एका माणसामध्ये 'ड्राय आइज'ची समस्या असते. तसेच त्यांना अस्पष्ट दिसणे, प्रकाशाबाबत अधिक संवेदनशील होणे तसेच डोळे सुजणे अशा समस्याही दिसून आल्या. '
ड्राय आइज' म्हणजे डोळ्यांचा कोरडेपणा. डोळ्यांत अश्रू न येणे, अश्रू लवकर सुकणे, डोळ्यांमध्ये जळजळ, सूज व वेदना अशा समस्या यामध्ये निर्माण होतात. याबाबत 2021 मध्येही संशोधन झाले आहे. त्यामध्ये म्हटले होते की, दर 10 पैकी एका कोरोना रुग्णाला डोळ्यांशी निगडित समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्येही 'ड्राय आइज'ची समस्या सर्वात मोठी आहे. असे मानले जाते की, डोळ्यांच्या आजाराचे कारण कोरोना आणि 'एसीई 2' एन्झाईममधील संबंध हे असू शकते. या एन्झाईमच्या मदतीनेच कोरोना विषाणू मानवी शरीरात प्रवेश करीत असतो. त्यानंतर विषाणू डोळ्यांमधील पेशींना संक्रमित करतो व डोळ्यांमध्ये समस्या निर्माण होतात.
हेही वाचलत का ?