अंतराळ स्थानकावर बॉयफ्रेंडशी झालं भांडण आणि तिनं ड्रील करून चक्क छिद्र पाडले! | पुढारी

अंतराळ स्थानकावर बॉयफ्रेंडशी झालं भांडण आणि तिनं ड्रील करून चक्क छिद्र पाडले!

मॉस्को : प्रेमात पडणे ही एक नैसर्गिक मानवी भावना मानली जाते. प्रेमाची भावना सुंदर जरी असली तरी त्यामध्ये स्वार्थ मिसळला की ती विकृतही बनू शकते. त्यामधून काय घडेल हे काही सांगता येत नाही. आता रशियाने म्हटले आहे की अमेरिकेची एक अंतराळ वीरांगना पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या अंतराळ स्थानकावर राहत असताना एका अंतराळवीराच्या प्रेमात पडली होती. तिथे एकदा तिचे बॉयफे्रंडशी भांडण झाल्यावर तिने स्पेस सेंटरशी जोडलेल्या रशियन मॉड्यूलमध्ये ड्रील करून चक्क छिद्र पाडले! तिला आपल्या घरी लवकर जाण्याची इच्छा असल्याने तिने रागाच्या भरात असे कृत्य केले.

रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’ या अंतराळ संशोधन संस्थेने हा आरोप केला आहे. 2018 मध्ये अमेरिकेची अंतराळवीरांगना सेरेना चान्सलर हिने असे धोकादायक पाऊल उचलले होते असे या संस्थेने म्हटले आहे. संस्थेने दोन वर्षांच्या तपासणीनंतर म्हटले आहे की त्यांच्या मॉड्यूलमध्ये हे दोन मिलीमीटरचे छिद्र सेरेनानेच पाडले होते. त्यासाठी तिने एका ड्रील मशिनचा वापर केला होता. त्यामुळे रशियन मॉड्यूलमधील हवेचा दाब कमी झाला. जर दोन आठवडे तो तसाच राहिला असता तर अंतराळ यानातील ऑक्सिजन कमी झाले असते आणि त्यामुळे अंतराळवीरांचा मृत्यूही झाला असता. मात्र, वेळीच या छिद्राची माहिती समजली आणि ते बुजवण्यात आले.

यापूर्वी असे समजले जात होते की अंतराळातील कचर्‍यामधील एखाद्या वेगवान तुकड्याच्या धडकेने हे छिद्र निर्माण झालेले असावे. मात्र, त्याच्या फॉरेन्सिक चाचणीनंतर आढळले की हे काम एखाद्या मानवाकडूनच झालेले आहे. आता रशियाने अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेविरुद्ध आपल्या देशात कायदेशीर कारवाई करण्याचीही तयारी केली आहे. मात्र, ‘नासा’ने हे आरोप काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. सेरेना ही अतिशय व्यावसायिक आणि सन्माननीय अंतराळवीर असून तिच्याकडून असे घडणे शक्यच नसल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. या प्रकरणामुळे आता पृथ्वीपासून 400 किलोमीटरवर, अंतराळातही मानवी भावनांचा कल्लोळ कसा कायम राहू शकतो हेच दिसून येत आहे.

Back to top button