Covid 19 : मुंबईत जोखमीच्या देशातून आलेले एकूण ९ जण कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

Covid 19 : मुंबईत जोखमीच्या देशातून आलेले एकूण ९ जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईत आफ्रिका तसेच इतर जोखमीच्या देशातून आलेले आणखी 5 प्रवासी कोविड (Covid 19) बाधित आढळलेले आहेत. त्यामुळे मुंबईत जोखमीच्या देशातून आलेल्या कोविड रुग्णांची संख्या 9 वर गेली आहे. मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर जोखमीच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला होता. या प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी  पाठविण्यात आले आहेत अशी माहिती यापूर्वीच राज्य आरोग्य विभागाने दिलेली होती.

मुंबई पालिका क्षेत्रात आढलेल्या 9 कोविड बाधित (Covid 19) रुग्णांमध्ये लंडनहून आलेले 5 तर मॉरिशस एक दक्षिण आफ्रिकेतील, एक पोर्तुगाल 1 तर जर्मनीतील एका रुग्णाचा समावेश आहे. पालिकेने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले आहे. या प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविड बाधित असले तरी लक्षणेविरहित आहेत. सर्वांचे नमुने हे डब्लू जी एस चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशाच्या संपर्कात आलेली 39 वर्षीय महिलेला देखील कोविडची बाधा झाल्याने तिला सेव्हन हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे असे इतर 13 देशांमधून जे प्रवासी देशात येत आहेत. त्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत. जे प्रवासी आरटीपीसीआर निगेटिव्ह आढळतील त्यांनाही 7 दिवस अलगिकरण केले जात आहे. तसेच त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात येणार असून आणि ते कोविड बाधित आढळल्यास त्यांच्या नमुन्याचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे.

जे प्रवासी ओमायक्रॉन सापडलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणार आहेत त्यांच्यातील देखील 5 टक्के प्रवाशांची प्रयोगशाळा तपासणी करून त्यातील पॉझिटिव्ह नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे सरकारने आदेशित केले आहे. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार सातत्याने करावा. ज्यांचे लसीकरण अद्याप अपुरे आहे अथवा ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी आपले लसीकरण त्वरेने पूर्ण करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

जोखमीच्या देशातून आलेल्या बाधित रुग्णांबाबत

21 वर्षाचा पुरुष जो 10 नोव्हेंबर रोजी लंडनहून आला. तर 47 वर्षीय व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी मॉरिशसहून आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला 39 वर्षांची व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी तर लंडनहून आलेला 25 वर्षांचा पुरुष जो रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडला आहे. तो 1 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. 17 नोव्हेंबर रोजी  रोजी लंडनहून आलेला 66 वर्षीय पुरुष

25 नोव्हेंबर रोजी पोर्तुगालहून आलेला 69 वर्षांचा पुरुष, 13 नोव्हेंबर रोजी लंडनहून आलेला 34 वर्षीय पुरुष तर 02 डिसेंबर रोजी लंडनहून आलेला 45 वर्षीय पुरुष आणि त्याच दिवशी जर्मनीहून आलेला 38 वर्षांचा पुरुषाला कोविडची लागण झाली आहेत्याच सोबत या प्रवाशांचा संपर्क ट्रेसिंग सुरू असून दक्षिण आफ्रिकेतील एक 36 वर्षीय महिला  कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तिला देखील सेव्हन हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर नमुना डब्लूजीएस चाचणीसाठी पाठवला आहे.

Back to top button