विमानाच्या चाकांजवळ बसून तरुणाचा अडीच तास प्रवास! | पुढारी

विमानाच्या चाकांजवळ बसून तरुणाचा अडीच तास प्रवास!

वॉशिंग्टन ः काही लोक भलतेच धाडस करीत असतात. अफगाणिस्तानात धोकादायक विमान प्रवास करीत असताना खाली कोसळलेल्या दोन व्यक्तींचे व्हिडीओ पाहून जग थक्क झाले होते. अमेरिकेतील एका व्यक्तीने असाच प्रकार केला आहे. त्याने विमानाच्या लँडिंग गेअरवर बसून तब्बल अडीच तास प्रवास केला.

विमान उतरल्यानंतर विमानतळ कर्मचार्‍यांनी एक व्यक्ती लँडिंग गेअरवर बसल्याचे पाहिले त्यावेळी त्यांना धक्काच बसला.
अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाने ग्वाटेमाला येथून मियामीसाठी उड्डाण केले होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांशिवाय आणखी एक व्यक्ती या विमानातून प्रवास करीत होती. ही व्यक्ती विमानाच्या आत नव्हे तर बाहेर होती.

विमानाला मियामीला पोहोचण्यासाठी अडीच तास लागले. तोपर्यंत हा माणूस 33 हजार फूट उंचीवर विमान उडत असताना या लँडिंग गिअरवरच बसून होता. विशेष म्हणजे त्याला कोणतीही हानी पोहोचली नाही.

विमानतळावर या लँडिंग गिअर बॉक्समध्ये बसलेल्या 26 वर्षांच्या तरुणाला पकडण्यात आले. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. विमानाने लँडिंग केले त्यावेळी भेदरलेल्या स्थितीतील या तरुणाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.

Back to top button