‘ओमायक्रॉन’च्या धास्तीने कुडाळात पुन्हा लसीकरणासाठी गर्दी! | पुढारी

‘ओमायक्रॉन’च्या धास्तीने कुडाळात पुन्हा लसीकरणासाठी गर्दी!

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिकांची पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बर्‍यापैकी आटोक्यात आल्यानंतर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी घटली होती. डोस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत होते, मात्र आता पुन्हा लसीकरणासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असून सोमवारी कुडाळ तालुक्यात बहुतांशी ठिकाणी काही वेळातच लससाठा संपला.

‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने खबरदारीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन अधिक अ‍ॅलर्ट झाले असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

दरम्यान लसीकरणासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होताना पाहावयास मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी शासन व प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. लसीकरणावर अधिक भर देण्यात आला. गणेशोत्सवापर्यंत कुडाळसह जिल्हाभरात सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांची लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पहाटेपासूनच नागरिकांच्या लसीकरण केंद्रांवर लससाठी रांगा लागत होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव बर्‍यापैकी कमी होताच गेल्या काही दिवसांत लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी बर्‍यापैकी घटली होती. प्रतिदिन एका लसीकरण केंद्रावर 100 डोस उपलब्ध होऊनही लससाठा शिल्लक राहत होता. गर्दी कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला होता. मात्र, आता नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खबरदारीच्या द़ृष्टिने नागरिक आवश्यक ती सावधगिरी बाळगत आहेत.

सोमवारी कुडाळ ग्रामीण रूग्णालय, जिल्हा रुग्णालयसह तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लशीचा पहिला व दुसर्‍या डोससाठी लस उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, या लसीकरण केंद्रांवर अचानक नागरिकांची गर्दी झाली. लसीकरण सत्र सुरू होताच काही वेळातच बर्‍याच केंद्रावरील लससाठाही संपला. त्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले. कुडाळ शहरातील पडतेवाडी शाळा सुरू झाल्याने तेथील लसीकरण केंद्र ग्रामीण रुग्णालयाच्या मागील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. या इमारतीत ग्रामीण रुग्णालय व पणदूर प्रा.आ. केंद्र अंतर्गत पडतेवाडी शाळेतील केंद्र अशी दोन लसीकरण केंद्र एकाच इमारतीत चालू आहेत. सोमवारी दोन्ही ठिकाणी नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी झाली.

हेही वाचलत का?

Back to top button