जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जाऊन शेतक-यांनी अर्ज सादर केला. या अर्जामध्ये, मी खालील सही करणारा पीकविमा धारक शेतकरी मौजा शिवणी ता. घाटंजी जि. यवतमाळ येथील रहिवाशी असुन याद्वारे आपणास नम्र निवेदन करतो की, या वर्षीच्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन या पिकाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने मला ५२ रुपये ९९ पैसे इतक्या रक्कमेचा भरीव पीकविमा मंजुर केला आहे. यामुळे मी खुप खुप खुश व आनंदीत झालो आहे. सदरची रक्कम माझ्या सारख्या एका गरीब शेतकऱ्यासाठी ५० खोक्यापेक्षाही मोठी असल्याने या रक्कमेच्या सुरक्षेची मला फारच काळजी लागली आहे. शिवाय बँकेतून ही रक्कम पिशवी अथवा सुटकेस मधुन नेणे मला शक्य नसल्याने रक्कम नेण्यासाठी मी वडिलोपार्जित तिजोरी व बैलबंडी आणली आहे. रुपये ५२.९९ इतक्या मोठ्या रक्कमेने भरलेली तिजोरी बैलगाडीवरून नेतांना रस्त्यात लुटमार होण्याची किंवा दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर माझ्या पीकविम्याच्या रुपये ५२.९९ कडे लागली आहे. माझ्यासाठी ही रक्कम अतिशय महत्त्वाची आहे. सीबील च्या अटीमुळे बँकेचे पीककर्ज न मिळाल्याने सावकाराकडून दिडीतिडीने घेतलेले कर्ज पिकविम्याच्या या पैश्यातून सर्वप्रथम फेडीन. उभ्या पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली प्राण्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करीन. तब्येत बरी नसतांनाही शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या बायकोला दवाखान्यात नेईन. गेल्या अनेक महिन्यांपासून फाटक्या पॅटेंत शाळेत जाणाऱ्या पोराला कपडे घेईन. वयात आलेल्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न करीन. अन् पूर्ण कुटुंबासह एकदा गुवाहाटीला पर्यटनासाठी जाऊन येईल आणि संकटग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात भरभराटी निर्माण करणाऱ्या देशी – विदेशी महागड्या गाड्यांच्या प्रदर्शनासाठी पालकमंत्री ना. संजय राठोड यांना भरीव आर्थिक देणगी देईन व उरलीसुरली रक्कम तिजोरी सांभाळून ठेवीन. म्हणून पीकविम्याची ही मदत माझ्या व माझ्या कुटुंबासाठी खुपचं महत्वाची आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम घरी नेतांना रस्त्यात लुटमारीची प्रचंड भिती वाटत असल्याने आपण मला पीकविमा रक्कमेच्या सुरक्षेसाठी किमान सहा सशस्त्र पोलीस पुरवावे, अशी मागणी शेतक-याने पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली आहे. शेतक-यांनी या मागणीच्या माध्यमातून सरकारला फटकारले असून आपला संताप व्यक्त केला आहे. आज गुरुवारी दुपारी शेतकऱ्यांनी वाजत गाजत लोखंडी तिजोरी नेऊन पोलिस अधिक्षकांना संरक्षणासाठी अर्ज सादर केले. या मोर्चात देवानंद पवार, शैलेष इंगोले, अशोक भुतडा, प्रा. विठ्ठल आडे, संजय डंभारे, उमेश इंगळे, बंडु जाधव, घनशाम अत्रे, संगीत काळे, रामधन राठोड, रामचंद्र राठोड, वासुदेव राठोड, रणजीत जाधव, अमोल बेले, प्रदीप डंभारे, अरुण ठाकुर, लालसिंग अजमेरकर, कुणाल जतकर यांच्यासह मोठया संख्येत शेतकरी सहभागी झाले होते.