नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासूनच भारतीय आयुर्वेद परंपरा या समस्येवर एखादा तोडगा काढू शकते असे मानले जात होते. आता याबाबत बनारस हिंदू विश्वविद्यालयातील संशोधकांना यश मिळाले आहे. अश्वगंधाच्या रेणूमुळे कोरोना विषाणूचे जनुक नष्ट करण्यात त्यांना यश आले. जगात प्रथमच अश्वगंधाच्या मॉलिक्यूलचा कोरोना विषाणूवर होणारा परिणाम यशस्वीरीत्या अभ्यासण्यात आला आहे. या संशोधनाला जर्मन पेटंटही मिळाले आहे. वर्षअखेरपर्यंत भारताला कोरोनाविरुद्ध लढाईचे हे मोठे नवे शस्त्र मिळण्याची शक्यता आहे.
'बीएचयू'च्या शास्त्रज्ञांच्या टीमला तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे यश मिळाले. तीन हजारांहून अधिक मॉलिक्यूल आणि 41 वनस्पतींच्या चाचणीनंतर अश्वगंधाच्या मॉलिक्यूलने 87 टक्क्यांहून अधिक कोरोना व्हायरस नष्ट करण्यात मदत केली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर जेनेटिक डिसऑर्डरचे प्रा. परिमल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार 'सार्स-कोव्ह-2' या व्हायरसवर हे नवे शस्त्र प्रभावी ठरू शकते.
अश्वगंधापासून निघणारे सॉम्निफेरिसिन फायटोमॉलिक्यूल ग्रोथ इनहिबिटर हे या विषाणूचा प्रभावी सामना करते. अश्वगंधाचा हा मॉलिक्यूल एकाच वेळी कोरोनाच्या तीन जीनचा खात्मा करण्यास उपयुक्त ठरेल. मानवी पेशींवरही त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. सरकारच्या मदतीने त्याची क्लिनिकल चाचणी लवकरच केली जाईल.
हेही वाचा :