मानवावरील चाचणीसाठी ‘मेंदूतील चिप’ सज्ज; अंधांनाही चिपद्वारे पाहता येणार | पुढारी

मानवावरील चाचणीसाठी ‘मेंदूतील चिप’ सज्ज; अंधांनाही चिपद्वारे पाहता येणार

‘टेस्ला’, ‘स्पेस एक्स’ आणि ‘ट्विटर’चे सर्वेसर्वा असलेले अब्जाधीश उद्योजक एलन मस्क यांची ब्रेन-चिप कंपनी ‘न्यूरालिंक’ला मानवावरील चाचण्यांसाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास अंधांनाही चिपद्वारे पाहता येणार आहे. अर्धांगवायूचा त्रास असलेले रुग्ण केवळ मनात विचार आणून मोबाईल-संगणक ऑपरेट करू शकतील. या चिपचे हे काही संभाव्य लाभ…

फोन थेट मेंदूला जोडणार ‘न्यूरालिंक’ने

नाण्यांच्या आकाराचे हे उपकरण तयार केले आहे. त्याला ‘लिंक’ असे नाव देण्यात आले आहे. हे उपकरण संगणक, मोबाईल फोन किंवा इतर कोणतेही उपकरण थेट मेंदूच्या क्रिया (न्यूरल इम्पल्स)द्वारे नियंत्रित करण्यास सक्षम करते. उदाहरणार्थ, अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर तो फक्त विचार करून माऊसचा कर्सर हलवू शकेल.

कॉस्मेटिकली अद़ृश्य चिप

‘आम्ही पूर्णपणे प्रत्यारोपण करण्यायोग्य, ‘अद़ृश्य’ मेंदू-संगणक इंटरफेस डिझाईन करत आहोत, जेणेकरून तुम्ही जिथे जाल तिथे संगणक किंवा मोबाईल डिव्हाईस नियंत्रित करू शकाल,’ न्यूरालिंकने ही माहिती दिली. मेंदूच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणार्‍या भागात मायक्रो-स्केल थ्रेडस् टाकले जातील. प्रत्येक थ्रेडमध्ये अनेक इलेक्ट्रोड असतात, जे इम्प्लांटशी जोडतात.

रोबोटिक सिस्टिम डिझाईन

कंपनीने स्पष्ट केले की, लिंक्सवरील थ्रेड इतके बारीक आणि लवचिक आहेत की ते मानवी हाताने बसवले जाऊ शकत नाहीत. यासाठी कंपनीने रोबोटिक प्रणाली तयार केली आहे. हे थ्रेडला घट्ट आणि कार्यक्षमतेने रोपण करण्यास सक्षम करतील. यासोबतच न्यूरालिंक अ‍ॅपचीही रचना करण्यात आली आहे. ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटीद्वारे तुम्ही तुमचा की-बोर्ड आणि माऊस यावर विचार करून थेट नियंत्रण करू शकता. डिव्हाईस चार्ज करणेदेखील आवश्यक आहे. यासाठी, कॉम्पॅक्ट इंडक्टिव्ह चार्जर डिझाईन केले गेले आहे, जे बॅटरी बाहेरून चार्ज करण्यासाठी इम्प्लांटशी वायरलेसरीत्या कनेक्ट होते.

हेही वाचा : 

Back to top button