मंगळावरून प्रथमच पृथ्वीकडे पाठवला सिग्नल

वॉशिंग्टन : परग्रहांवरून कोणते सिग्नल्स येत आहेत का हे नेहमीच पाहिले जात असते. त्यामागील कारण म्हणजे एलियन्स किंवा परग्रहवासी. आता पृथ्वीवासीयांनीच मंगळ ग्रहावरून पृथ्वीकडे सिग्नल पाठवला आहे. अशा पद्धतीने मंगळावरून पृथ्वीकडे प्रथमच संदेश पाठवला गेला असून तो 16 मिनिटांनी पृथ्वीला मिळाला.
हा सिग्नल युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘एक्झोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर’ने पाठवला होता. हा सिग्नल 24 मे रोजी रात्री 9 वाजता मंगळाच्या कक्षेत फिरणार्या ‘टीजीओ’ ने पाठवला होता, जो 16 मिनिटांनी पृथ्वीला मिळाला. ‘अ साईन इन स्पेस’ प्रकल्पांतर्गत हा प्रयोग करण्यात आला. या प्रकल्पाचा उद्देश हा आहे की, जर आपल्या पृथ्वीवर दुसर्या ग्रहावरून किंवा परग्रहवासीयांकडून एखादा सिग्नल पाठवला गेला, तर तो आपल्याला मिळू शकेल किंवा नाही.‘टीजीओ’कडून पाठवलेले सिग्नल वेस्ट व्हर्जिनियामधील ग्रीन बँक टेलिस्कोप, इटलीमधील मेडिसीना रेडिओ अॅस्ट्रॉनॉमिकल स्टेशन, कॅलिफोर्नियामधील अॅलन टेलिस्कोप अॅरे आणि न्यू मेक्सिकोमधील व्हेरी लार्ज अॅरे यांनी प्राप्त केले.
त्याच वेळी, सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञ आणि ‘अ साईन इन स्पेस’ प्रकल्पाच्या प्रमुख डॅनिएला डी पॉलिस म्हणाल्या, आम्ही नेहमीच शक्तिशाली आणि परिवर्तनीय घटनांमध्ये अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. परग्रहवासीयांकडून सिग्नल किंवा संदेश प्राप्त करणे हा संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठा परिवर्तनाचा अनुभव असेल. डी पॉलिस यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि अवकाश शास्त्रज्ञांच्या टीमसह मंगळावरून मिळालेला हा सिग्नल डीकोड करण्यासाठी लोकांची मदत घेतली आहे. त्यांच्या मते, डीकोडिंगच्या प्रक्रियेतून पृथ्वीवर पाठवलेल्या सिग्नलमध्ये किंवा संदेशात काय लिहिले आहे ते कळेल.