Mysterious Shiva Temple : ‘या’ शिवमंदिरातील नंदीचा आकार वाढतोच आहे… | पुढारी

Mysterious Shiva Temple : ‘या’ शिवमंदिरातील नंदीचा आकार वाढतोच आहे...

हैदराबाद : आपल्या देशात अनेक ठिकाणी अशी काही रहस्ये दडलेली आहेत, ज्याचे उत्तर अद्याप कुणालाही मिळालेले नाही. कैलास पर्वतापासून ते रामसेतूपर्यंत केवळ थक्क करणार्‍या अद्भूूत गोष्टी भारतात आहेत. देशोदेशीच्या संशोधकांनी येऊन संशोधनेही केली आहे. मात्र, त्यांनाही याचा थांग लागलेला नाही. दक्षिण भारतात असलेल्या एका शिवमंदिरातील नंदीचा आकार (Mysterious Shiva Temple ) नियमितपणे वाढतच आहे. हे प्राचीन मंदिर असून, पुरातत्त्व खात्यानेही याला दुजोरा दिला आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात श्री यंगती उमा महेश्वर नामक मंदिर आहे. या मंदिराची उभारणी 15 व्या शतकात करण्यात आली आहे. हैदराबादपासून सुमारे 308 कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे.

तर विजयवाडापासून याचे अंतर 359 कि.मी. आहे. या मंदिरातील नंदीची मूर्ती मोठी आहे. या शिवमंदिरातील (Mysterious Shiva Temple ) नंदीचा आकार गेली अनेक वर्षे वाढतच चालला आहे. नंदीच्या वाढत चाललेल्या आकारमानामुळे मंदिरातील काही खांबही हटवण्यात आले आहेत. मंदिरातील नंदीची मूर्ती ही पूर्वी छोट्या स्वरूपात होती. मात्र, आता तिने भव्य रूप धारण केले आहे. पुरातत्त्व खात्याने या ठिकाणी संशोधन केले असता, त्यांनाही ही गोष्ट पटली. पुरातत्त्व खात्यानेही ही बाब मान्य केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्रत्येक 20 वर्षांनी या नंदीचा आकार एक इंचाने वाढतो. ही मूर्ती बनवण्यासाठी ज्या दगडाचा वापर करण्यात आला होता त्या दगडाचा नैसर्गिक गुण वाढणारा आहे. यामुळे या मूर्तीचा आकार वाढत आहे, असेही सांगितले जाते.

आंध्र प्रदेशातील या मंदिरात शिवशंकर (Mysterious Shiva Temple ) आणि पार्वती देवीची अर्धनारीनटेश्वर रूपात स्थापन करण्यात आली आहे. एकाच पाषाणातून ही पूर्ण मूर्ती घडवल्याचे पाहायला मिळते. देशभरातील केवळ या मंदिरात शिवशंकराच्या मूर्तीची पूजा केली जाते, असा दावा केला जातो. बाकी सर्व मंदिरांमध्ये शिवपिंडीची पूजा केली जाते. या मंदिर परिसरातील निसर्गसौंदर्यही केवळ अप्रतिम असेच आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पुष्कर्णिनी नावाचा एक पवित्र जलस्रोत आहे, जो कायम वाहत असतो. या ठिकाणी बारा महिनेही पाणी असते.

हेही वाचा : 

Back to top button