Samruddhi Highway : टायर घासलेल्या वाहनांना ‘समृद्धी’ वर नो एंट्री | पुढारी

Samruddhi Highway : टायर घासलेल्या वाहनांना 'समृद्धी' वर नो एंट्री

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वाढते अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर टायर घासलेल्या चारचाकी वाहनांना दंड आकारण्यात येत आहे. आरटीओ आणि एमएसआरडीसीने संयुक्त मोहीम राबवत वाहनांच्या टायरची फिटनेस तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे टायर चांगल्या स्थितीत नसल्यास यापुढे वाहनचालकांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

वाहनाचे टायर नादुरुस्त अवस्थेत आढळल्यास त्यांना चलान देण्यात येईल. दंडाच्या रकमेबाबत आरटीओने अद्याप निर्णय घेतलेला नाही. महामार्गावर १०० हून अधिक पेट्रोलिंग कर्मचारी आहेत. यासंदर्भात सेव्ह लाईफ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने एक सर्वेक्षण केले होते. मुंबई – नागपूर द्रुतगती मार्ग (समृद्धी महामार्ग) आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बांधण्यात आलेल्या सर्वोत्तम दर्जाच्या महामागपैकी एक आहे, असे नमूद आहे. अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी टायरमध्ये नायट्रोजन भरण्याचे आवाहनही आरटीओने केले आहे. इंधन केंद्रांना नायट्रोजन एअर फिलिंग केंद्रे ठेवण्यास एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

क्रीक रिस्पॉन्स वाहने, मोबाईल ॲप आणि समुपदेशनही

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २१ क्वीक रिस्पॉन्स वाहनांसह टोइंग व्हॅन आणि मेकॅनिक देखील उपलब्ध आहेत. आरटीओ आणि राज्य महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. एक व्हॉट्सॲप ग्रुप आणि मोबाईल अॅप आहे. जिथे रोजच्या घडामोडींची छायाचित्रे शेअर केली जातात. एमएसआरडीसीने आरटीओ आणि हायवे पोलिसांना एक जागा उपलब्ध करून दिली आहे. जिथे वाहनचालकांचे समुपदेशन केले जाते.

अलीकडील ९० टक्के अपघात हे चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत, ज्यात ओव्हरस्पीडिंगचा समावेश आहे. वाहनांची अवस्थाही अपघातांना कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. एक्स्प्रेसवेच्या स्ट्रक्चरल बिघाडामुळे एकही अपघात झाला नाही.
– संजय यादव, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

कारचा टायर फुटून अपघात

घासलेले टायर असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू असतानाच एका कारचा टायर फुटून अपघात झाला. त्यात दोन मुलांसह चौघे थोडक्यात बचावले. नागपूरहून एक कार गुरुवारी समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना येळकेली ते पुलगावदरम्यान कारचा टायर फुटून ती बॅरिकेट्सवर आदळली. यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. कारची टाकी फुटून ऑईल रस्त्यावर पसरले होते.

Back to top button