Mobile charger : …म्हणून चार्जरची वायर असते लहान! | पुढारी

Mobile charger : ...म्हणून चार्जरची वायर असते लहान!

नवी दिल्ली : आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू ‘अशाच का?’ असा प्रश्न बहुतेकांना पडत नसतो. मात्र, काहींना त्याबाबत कुतूहल असू शकते. सध्या स्मार्टफोन ही गरजेची वस्तू बनली आहे. स्मार्टफोनसोबत मिळणार्‍या चार्जर, केबल, हेडफोन आणि स्क्रीनगार्ड या अ‍ॅक्सेसरीजदेखील तितक्याच गरजेच्या आहेत. कोणत्याही स्मार्टफोनसाठी (Mobile charger) चार्जर खूप महत्त्वाचा असतो. काही अपवाद वगळता प्रत्येक स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर दिला जातो; पण या चार्जरची वायर फार लहान असते. या कारणास्तव, अनेक वेळा चार्जिंगदरम्यान फोन वापरताना यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो. भलेही वायर छोटी असल्याने तुम्हाला त्रास होत असेल; पण ही वायर खूप उपयुक्त असते. मोबाईल कंपन्या चार्जरसोबत जाणूनबुजून लहान वायर देतात. कदाचित ही बाब ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल; पण त्यामागे कंपन्यांचा खास हेतू आहे.

मोबाइल चार्जरची केबल लहान असण्याचा फायदा काय आणि कंपन्या असं का करतात, या प्रश्नांची उत्तरे पाहूया. फोन चार्जिंग सुरू असताना जास्त वेळ वापरू नये, यासाठी मोबाईल कंपन्या फोनच्या चार्जरची वायर लहान ठेवतात. चार्जिंग करताना फोन वापरल्याने त्याची बॅटरी लवकर खराब होते. तसेच मोबाईल चार्ज करताना वापरल्याने तो गरमदेखील होतो. याशिवाय फोन चार्जिंगला लावून वापरत असाल तर तो पूर्ण चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा स्थितीत काही वेळा मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. चार्जिंग सुरू असताना मोबाईल वापरल्याने फोनचा बॅटरी बॅकअपही कमी होतो. काही वर्षांपूर्वी चार्जरची वायर खूप लांब असायची. त्यामुळे फोन चार्ज करताना तो आपल्या आजूबाजूला ठेवून वापरला जायचा; मात्र कालांतराने लांब वायर असण्याचे तोटे समोर येऊ लागले. चार्जिंग सुरू असताना फोन वापरल्याने त्याच्या बॅटरीत समस्या निर्माण होऊ लागल्या आणि ग्राहकांनी कंपन्यांकडे फोनमधली बॅटरी लवकर खराब होत असल्याच्या तक्रारी सुरू केल्या. वाढत्या तक्रारींमुळे कंपन्यांचंही नुकसान होऊ लागले. कंपन्यांच्या उत्पादनाविषयी चुकीची माहिती पसरवली जाऊ लागली. यूजर्स फोनविषयी वाईट बोलू लागले. याशिवाय बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या. या समस्या दूर करण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी चार्जरच्या वायरची लांबी कमी केली, जेणेकरून यूजर्स चार्जिंग सुरू असताना फोन वापरू शकणार नाहीत.

हेही वाचा : 

Back to top button