supersize baby : वजनदार बाळाचा जन्म; तब्बल ७ किलो वजन आणि २ फूट लांबीचे बाळ पाहून डॉक्टरही चक्रावले | पुढारी

supersize baby : वजनदार बाळाचा जन्म; तब्बल ७ किलो वजन आणि २ फूट लांबीचे बाळ पाहून डॉक्टरही चक्रावले

ब्राझिलिया : काही नवजात मुलं ही ‘प्री-मॅच्युअर’ म्हणजेच मुदतीपूर्वीच जन्मलेली असतात आणि त्यांचे वजन अतिशय कमी असते. अशी मुलं वगळता अन्य सर्वसामान्य नवजात बाळांचे वजन हे साधारण तीन किलोंच्या आसपास असते. मात्र, कधी कधी भलतेच वजनदार बाळही जन्माला येऊ शकते. सध्या अशाच एका बाळाची चर्चा सर्वत्र होते आहे. ब्राझीलमधील एका महिलेने तब्बल सात किलो वजनाच्या बाळाला (supersize baby) जन्म दिला आहे!

क्लिडिन सँटोस नावाची महिला रूटिन प्रेग्नन्सी टेस्टसाठी रुग्णालयात गेली. तिथे तिच्या तपासण्या केल्यानंतर तिचे सिझेरियन करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करून घेतले. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच 18 जानेवारीला या महिलेची सिझेरियन डिलिव्हरी झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. पॅरिंटिन्समधील पॅड्रे कोलंबो हॉस्पिटलमध्ये या महिलेची डिलिव्हरी झाली; पण हे बाळ साधंसुधं नव्हतं तर खूप खास होतं. त्याला पाहून डॉक्टरही चक्रावले. त्यांनी त्याला ‘सुपरसाईझ बेबी’ (supersize baby) असे म्हटले आहे.

तब्बल 7 किलो वजन आणि 2 फूट लांबीचे हे बाळ आहे. तो इतका मोठा आहे की त्याच्या पालकांनी त्याच्यासाठी घेतलेली कपडेही त्याच्या मापाची होत नव्हती. याआधी ब्राझीलमध्ये 2014 साली 6.74 किलो वजनाचे बाळ (supersize baby) जन्मले होते. पेड्रो अ‍ॅल्युझिओ असे त्याचे नाव. त्याची उंची 57 सें.मी. होती. म्हणजे या बाळाने आता त्याचा विक्रम मोडला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नवजात बाळ आणि त्याची आई पूर्णपणे ठीक आहे. बाळाचे नाव एंगर्सन असे ठेवण्यात आले आहे. जगातील सर्वात वजनदार बाळाचा विचार करता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार आतापर्यंत जगातील सर्वात वजनदार बाळ 1955 साली इटलीमध्ये जन्माला आले होते. त्याचे वजन 10.2 किलो होते.

हेही वाचा : 

Back to top button