'चॅटबॉट'च्या सहाय्याने मृत व्यक्तींशीही चॅटिंग! | पुढारी

'चॅटबॉट'च्या सहाय्याने मृत व्यक्तींशीही चॅटिंग!

वॉशिंग्टन : आधुनिक तंत्रज्ञानाने आभासी दुनियेचीही व्याप्ती वाढवलेली आहे. या जगातून गेलेली एखादी व्यक्ती समोर उभी राहून बोलत आहे असा भास निर्माण करणारे तंत्रज्ञानही आले आहे याची अनेकांना माहिती असेल. आता चॅटबॉटच्या सहाय्याने ऐतिहासिक व्यक्ती किंवा अनेक वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेल्या लोकांशीही बातचित करणे (सध्या चॅटिंग!) शक्य झाले आहे. अर्थातच हा सर्व काही खरा नव्हे तर आभासी प्रकारच आहे.

कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, काल्पनिक पात्राशी चॅट करण्याची सोय आता निर्माण झाली आहे. अगदी विल्यम शेक्सपियरपासून एलन मस्कपर्यंत कुणाशीही या तंत्राने चॅटिंग केले जाऊ शकते. ‘गुगल’चे दोन माजी संशोधक डॅनियल डी फ्रीटास आणि नोम शाजीर यांनी स्थापन केलेली कंपनी आणि साईट ही नव्या प्रकारचा चॅटबॉट विकसित करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. हा चॅटबॉट अगदी माणसासारखा चॅट करू शकत नसला तरी त्याच्याजवळ जाणारा आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘ओपन एआय’ नावाच्या लॅबनेही ‘चॅटजीपीटी’ नावाचा बॉट लाँच केला होता. त्याच्याबरोबर चॅटिंग करून लाखो लोकांना वाटले की, आपण खरोखरच एखाद्या माणसाशी चॅटिंग करीत आहोत. अशा प्रकारच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) असलेल्या टेक्नॉलॉजीवर गुगल, मेटा आणि अन्य दिग्गज टेक कंपन्या सध्या काम करीत आहेत. काल्पनिक आणि खोटी बातचीत करण्यात उस्ताद असलेले हे चॅटबॉट अशा बातचितचे कौशल्य इंटरनेटवर लोकांनी पोस्ट केलेल्या डेटापासूनच शिकतात. त्यामुळे बर्‍याच वेळा ते चुकीच्या व तद्दन खोट्या गोष्टींचाही आधार घेऊ शकतात. हेट स्पीच, भेदभाव आणि अभद्र भाषेचाही वापर होऊ शकतो.

चुकीच्या हाती पडल्यास ते भ्रामक माहिती आणि अफवा पसरवण्याचे साधनही बनू शकतात हा यामधील मोठा धोका आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या माजी एआय रिसर्चर मार्गारेट मिशेल यांनी म्हटले आहे की, या चॅटबॉटबाबत कोणतेही दिशानिर्देश नसल्याने ते इंटरनेटवर आधीपासूनच असलेल्या पक्षपाती व विषारी माहिती फैलावण्याचे माध्यम बनत आहेत. मात्र, ‘कॅरेक्टर एआय’सारख्या कंपन्यांना वाटते की जनता अशा चॅटबॉटच्या त्रुटींना समजू शकतील व त्यांच्या म्हणण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाहीत! सध्या हे केवळ मनोरंजनाचे साधन बनत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button