Bacteria : काही जीवाणू उत्सर्जित करतात चक्क वीज | पुढारी

Bacteria : काही जीवाणू उत्सर्जित करतात चक्क वीज

लंडन : समुद्रांच्या अथांग खोलीत अनेक रहस्यमय जीव दडलेले आहेत. त्यामध्येच काही विशिष्ट अशा (Bacteria) जीवाणूंचाही समावेश आहे. महासागरांच्या तळातील किंवा अगदी जमिनीतही अत्यंत खोलवर असलेले काही जीवाणू चक्क वीज उत्सर्जित करतात. ‘जियोबॅक्टर’ या जीनसमधील जीवाणूंमध्ये ही क्षमता असते.

या जीवाणूंमध्ये (Bacteria) ऑक्सिजनचा वापर करून घेण्याची क्षमता नसते. त्यांच्या चयापचय क्रियेतून अतिरिक्त इलेक्ट्रॉन्स निर्माण होतात. मानव आणि अन्य हवेच्या सहाय्याने श्वासोच्छ्वास करणार्‍या जीवांमध्ये अशा इलेक्ट्रॉन्सना बांधून ठेवण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करण्याची क्षमता असते. मात्र, जे सजीव ऑक्सिजनचा वापर करीत नाहीत त्यांच्यामध्ये ही सोय नसते.

जियोबॅक्टर जीवाणूही (Bacteria)  असेच असतात. ते मानवी केसांपेक्षा एक लाख पटीने सूक्ष्म असलेल्या नलिका निर्माण करतात व त्यामधून असे अतिरिक्त इलेक्ट्रॉन्स बाहेर ढकलतात. 2021 मध्ये संशोधकांना आढळले की अशा इलेक्ट्रिक वायर्स या ‘सायटोक्रोम’ नावाच्या प्रोटिनपासून बनलेल्या असतात. अशा जियोबॅक्टरची एखादी कॉलनी आपल्या एखाद्या विद्युत उपकरणालाही ऊर्जापुरवठा करू शकते! अर्थात हे जीवाणू मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करीत नाहीत. त्यामुळे एखाद्या सूक्ष्म अशा उपकरणालाच त्यांच्यापासून ऊर्जा मिळून ते चालू शकेल!

हेही वाचा :  

Back to top button