Deadly fish : बाप रे..! सायनाईडपेक्षाही 1,200 पट जास्त विषारी मासा सापडला | पुढारी

Deadly fish : बाप रे..! सायनाईडपेक्षाही 1,200 पट जास्त विषारी मासा सापडला

लंडन : जगभरात अनेक लोकांच्या आहारात मासे असतात. माशामुळे ‘ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड’ सारखी पोषक तत्त्वे मिळत असतात. अनेक प्रकारचे मासे आहाराचा भाग बनलेली आहेत; पण काही मासे अत्यंत धोकादायकही असतात. पफर फिशसारखा मासाही असा धोकादायक असला तरी जपानमध्ये काही परवानाधारक शेफ त्याचा धोकादायक भाग काढून त्याचीही डीश बनवतात! मात्र एक मासा अत्यंत विषारी असून तो माणसासाठी प्राणघातक ठरू शकतो. असाच एक धोकादायक मासा ब्रिटनच्या समुद्र किनार्‍यावर सापडला आहे. ( Deadly fish )  हा मासा सायनाईडपेक्षा 1,200 पट जास्त विषारी आहे.

Deadly fish : ‘टेट्राओडोनटायडी’ प्रजातीचा  मासा अत्‍यंत धोकादायक

सायनाईड हे जगातील सर्वात धोकादायक विष मानले जाते. हे घेतल्यानंतर काही सेकंदातच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याच्यापेक्षाही अधिक विषारी असलेला हा मासा आहे. ब्रिटनच्या समुद्र किनार्‍यावर आढळणार्‍या या माशाचे नाव ‘ओशनिक पफर’ आहे. ‘टेट्राओडोनटायडी’ प्रजातीचा हा मासा अर्थातच अतिशय धोकादायक आहे. एक महिला कुटुंबासोबत फिरत असताना अचानक तिची नजर समुद्र किनारी पडलेल्या एका विचित्र प्राण्यावर पडली. त्यानंतर त्यांनी जवळ जाऊन तपासणी केली असता तो ‘ओशनिक पफर’ नावाचा विषारी मासा असल्याचे निष्पन्न झाले.

या माशाची लांबी सुमारे 12 इंच असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे दातही वेगळे होते. माशाचा चेहरा दिसायलाही खूप भीतीदायक असतो. तज्ज्ञ म्हणतात की या एकाच माशात इतके विष आहे की ते 30 प्रौढांना मारू शकते. त्याचे विष टाळण्यासाठी कोणतेही औषध नाही. यामुळेच तज्ज्ञ या विषारी माशांपासून दूर राहण्याचा आणि त्याला स्पर्श न करण्याची शिफारस करतात. हा मासा ब्रिटिश किनार्‍यावर क्वचितप्रसंगी आढळतो, असेही तज्ज्ञ सांगतात. हे मासे सहसा 10 ते 475 मीटर खोलीवर महासागरांमध्ये आढळतात.

हेही वाचा : 

 

 

Back to top button