Lionel Messi : अर्जेंटिना अभी जिंदा है... मेस्सीने मेक्सिकोला लोळवले! | पुढारी

Lionel Messi : अर्जेंटिना अभी जिंदा है... मेस्सीने मेक्सिकोला लोळवले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक 2022 मध्ये लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने मेक्सिकोचा 2-0 अशा गोल फरकाने पराभव करत स्पर्धेतील आपले अव्हान काय ठेवले आहे. कर्णधार लिओनेल मेस्सीने (64 मिनिट) आपल्या संघासाठी पहिला गोल केला. तर त्यानंतर युवा खेळाडू एन्झो फर्नांडिसने (87 मिनिट) दुसरा गोल करून गोल करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. गेल्या 11 सामन्यांमध्ये मेक्सिकोला अर्जेंटिनाकडून पराभव पत्करावा लागला आहे आणि या सामन्यातही अर्जेंटिनाविरुद्धची पराभवाची मालिका ते मोडू शकले नाहीत.

अर्जेंटिनासाठी हा विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे. यापूर्वीच्या सामन्यात सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा पराभव करून धक्का दिला होता. फुटबॉल इतिहासातील हा सर्वात मोठा अपसेट मानला जात होता. अशा परिस्थितीत राऊंड ऑफ 16 च्या फेरीत राहण्यासाठी अर्जेंटिनाला मेक्सिकोविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक होते आणि त्यांनी यात यश मिळवले.

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या. मात्र त्यात कोणत्याही संघाला यश आले नाही. मेक्सिको संघाच्या बचावपटूंनी अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीला पहिल्या हाफमध्ये गोल करण्याची एकही संधी दिली नाही.

मात्र, उत्तरार्धात मेक्सिकोला अर्जेंटिनाला फार काळ रोखता आले नाही. सामन्याच्या 64व्या मिनिटाला मेस्सीने मेक्सिकोच्या बचावपटूंना चकवून पहिला गोल केला. याचबरोबर अर्जेंटिनाने 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर एन्झो फर्नांडिसने सामन्याच्या 87 व्या मिनिटाला गोल करत आघाडी दुप्पट केली. सामना संपेपर्यंत मेक्सिकोला एकही गोल करता आला नाही आणि अर्जेंटिनाने हा सामना 2-0 असा जिंकला.

सौदी अरेबियाकडून पराभूत झाल्यानंतर अर्जेंटिना आता या विजयासह 3 गुणांसह गट-क मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पोलंड 4 गुणांसह गटात पहिल्या स्थानावर असून अर्जेंटिनाला आपला पुढचा सामना पोलंड विरुद्ध खेळायचा आहे. अर्जेंटिनासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे.

फिफा विश्वचषकातील मेस्सीचा हा 21 वा सामना होता. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी खूप खास होता. अर्जेंटिनाच्या सर्वकालीन महान डिएगो मॅराडोनाच्या 21 सामन्यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. विश्वचषकातील मेस्सीचा हा 8 वा गोल ठरला.

Back to top button