

न्यूयॉर्क ः कॅलिफोर्नियाच्या माँटेरे बेजवळ संशोधकांना क्राऊन जेलिफिशची नवी प्रजाती सापडली आहे. ही क्राऊन जेलिफिशची सर्वात मोठ्या आकाराची प्रजाती असून लालभडक, तबकडीच्या आकाराची ही जेलिफिश आहे. या जेलिफिशच्या अस्तित्वाबाबत आधी बोलले जात होते; पण आता ही जेलिफिश कॅमेर्यात कैद झाल्याने तिच्या अस्तित्वाची पुष्टी झालेली आहे.
या नव्या प्रजातीचे नाव 'अॅटोल्ला रेनोल्डसी' असे आहे. तिचा व्यास 5 इंच म्हणजेच 13 सेंटीमीटर आहे. या जेलिफिशला 26 ते 39 टेन्टॅकल्स आहेत. माँटेरे बे अॅक्वॅरियम रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी याबाबतची माहिती दिली आहे. एखाद्या लाल मुकुटासारखी या जेलिफिशची रचना असल्याने त्यांना 'क्राऊन जेलिफिश' असे म्हटले जाते.
'अॅटोल्ला' कुळातील अन्य जेलिफिशच्या तुलनेत ही नवी प्रजाती आकाराने मोठी आहे. या जेलिफिशचे टेन्टॅकल्स भक्ष्याला पकडण्यासाठी उपयोगी ठरत असतात. पाण्याच्या पृष्ठभागापासून 3300 फूट ते 13,100 फूट खोलीवर हे जेलिफिश आढळतात. माँटेरे बे येथील 'मिडनाईट झोन'मध्ये नव्या प्रजातीच्या क्राऊन जेलिफिशला कॅमेराबद्ध करण्यात आले. त्याची माहिती आता 'अॅनिमल्स' या नियतकालिकात देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?