पुणे : भिंतीला भगदाड पाडून ५२ लाखांचे मोबाईल चोरले | पुढारी

पुणे : भिंतीला भगदाड पाडून ५२ लाखांचे मोबाईल चोरले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रिलमशीनच्या सहाय्याने दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी ५२ लाख ३० हजार रुपये किंमतीचे तब्बल ३०७ मोबाईल फाेनवर डल्‍ला मारला. चोरट्यांनीरेकी करून ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोमवार पेठेतील खुराणा सेल्स मोबाईल शॉपीमध्ये घडली. याप्रकरणी मुकेश खुराना यांनी फिर्याद दिली आहे. समर्थ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेत कुमार सधन नावाच्‍या इमारतीमध्‍ये खुराना सेल्स मोबाइल शॉपी नावाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकाने नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री दुकान बंद केले. शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्‍यानंतर चोरी झाल्याचे उघड़कीस आले.

पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णु ताम्हणे आदींनी घटनास्‍थळी पाहणी केली. दुकानाच्या एका बाजूला जूनावाडा आहे. त्याबाजूने कोणी जात नसल्याचे पाहून चोरटयानी भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ५२ लाख ३० हजार रुपये किंमतीचे तब्बल ३०७ मोबाईल चोरुन नेले. गेल्या महिन्यात वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सराफ व्यवसायिकाच्या दुकानात अशाच प्रकारे भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्यात आली होती. त्यानंतर हा सलग चाेरीचा हा दुसरा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button