रोमन काळातील मातीच्या कलाकृतींचा कारखाना | पुढारी

रोमन काळातील मातीच्या कलाकृतींचा कारखाना

कैरो ः रोमन काळात माती, दगड व अन्य साधनांपासून अतिशय सुंदर कलाकृती बनवल्या जात होत्या. आता इजिप्‍तमध्ये प्राचीन काळातील एका रोमन कारखान्याचे अवशेष सापडले आहेत. याठिकाणी मातीच्या कलाकृती बनवल्या जात होत्या. तिथे गोलाकार भांडी, नाणी, मातीचे पुतळे आणि पूजाविधी करण्याच्या एका खोलीचेही अवशेष आढळले आहेत.

पश्‍चिम अ‍ॅलेक्झांड्रियाच्या तब्ब मातू येथे हे अवशेष सापडले. याठिकाणी असलेले प्राचीन कारागिर आधी दोन मुठी असलेली मातीची भांडी बनवत होते. या सुरईसारख्या भांड्याची मान उंच व बुडाच्या भागापेक्षा निमुळती असे. अशा भांड्यांमध्ये तेल, धान्य वगैरे वाहतूक करण्याच्या वस्तू ठेवल्या जात असत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या क्लासिकल आर्ट रिसर्च सेंटरने याबाबतची माहिती दिली आहे.

इजिप्‍तमधील पर्यटन आणि प्राचीन वस्तूंशी संबंधित मंत्रालयाने याठिकाणी अनेक इमारतींचे अवशेष शोधले आहेत. त्यामध्येच या ‘वर्कशॉप’चा समावेश आहे. याठिकाणी सिरॅमिकची भांडी तयार करण्याचा काळ संपल्यावर बायझेन्टाईन काळात म्हणजे इसवी सन 330 ते 1453 या काळात तेथील इमारती अन्य कामासाठी वापरल्या जाऊ लागल्या.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button