अमेरिकेच्या किनार्‍यावर आढळला ‘ब्ल्यू ड्रॅगन’! | पुढारी

अमेरिकेच्या किनार्‍यावर आढळला ‘ब्ल्यू ड्रॅगन’!

वॉशिंग्टन ः समजा आपण एखाद्या बेटावर फिरण्यासाठी गेलो आहोत. निळाशार समुद्र आणि मऊ, रूपेरी रेतीचा सुंदर किनारा. या किनार्‍यावर फिरत असतानाच करंगळीच्या आकाराचा, सुंदर, चमकदार निळ्या रंगाचा मासा दिसला तर? अनेकांना हा मासा उचलून घेण्याचा मोह होऊ शकतो. मात्र, हा ‘क्यूट’ मासा जीवघेणाही ठरू शकतो. असेच काहीसे अमेरिकेतील टेक्सासच्या सॅन एंटोनियोमध्ये राहणार्‍या एरिक यांता व त्याच्या पत्नीसोबत घडले.

हे दोघे मुस्तांग बेटावर फिरण्यासाठी गेले होते. किनार्‍यावर फिरत असतानाच त्यांना निळ्या रंगाचा छोटासा सुंदर मासा आढळला. एका दगडाला हा चिमुकला जीव चिकटलेला होता. एरिकने हा दगड उचलला आणि तो पाण्यात टाकला. तत्पूर्वी, त्याचा जवळून एक व्हिडीओही बनवला. त्यावेळी त्याला माहिती नव्हते की हा सुंदर मासा म्हणजे जहाल विषारी ब्ल्यू ड्रॅगन आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करून या माशाबाबत लोकांना विचारले.

एडिनबर्गमध्ये टेक्सास विद्यापीठात समुद्र विज्ञान विभागाचे प्राध्यापक डेव्हीड हिक्स यांनी सांगितले की हा ब्ल्यू ड्रॅगन मासा आहे. हे मासे किनार्‍यालगतच असतात. निळ्या शरीराच्या सहाय्याने ते शिकार्‍यांपासून स्वतःला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे खरे नाव ‘ग्लॉकस अटलांटिक्स’ असे आहे. ते जेली फिशच्या कुळातील ‘पोर्तगीस मॅन-ऑफ-वॉर’सारख्या जीवांची शिकार करतात. ‘पोर्तगीस’ ला विषारी काटे असतात व त्यांच्या पेशींना हे मासे आपल्या शरीरात संरक्षित करून ठेवतात. त्यांना ‘सिनिडोसाइटस्’ असे म्हटले जाते.

शिकार्‍यांपासून आपले रक्षण करण्यासाठी ब्ल्यू ड्रॅगन दुसर्‍याकडून घेतलेले हे हत्यार वापरतात. त्यापासून झालेली वेदना ‘पोर्तगीस’च्या वेदनेसारखीच असते व कधी कधी जीवघेणीही ठरते. त्यांच्या काट्यांचा दंश होताच उलट्या सुरू होतात. अशा रुग्णाला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे ठरते.

हेही वाचलंत का? 

Back to top button