वॉशिंग्टन : पृथ्वीचे बर्फाच्छादित दोन ध्रुवीय भाग सध्या उष्णतेने होरपळत आहेत. अंटार्क्टिका व आर्क्टिकचे तापमान सरासरीपेक्षाही जास्त वाढले आहे. विशेषज्ञांच्या मते, दोन्ही ध्रुवीय प्रदेशांतील तापमानात झालेल्या वाढीमुळे या भागातील बर्फ वितळण्याचा वेग आणखी वाढून समुद्राची पातळी वाढणार आहे. यामुळे भविष्यात किनारी भाग समुद्रात गडप होण्याची शक्यता आहे.
अंटार्क्टिकामधील हवामान केंद्रांनी यंदा विक्रमी तापमानाची नोंद केली. कोनकोर्डिया केंद्रावरील तापमान शुक्रवारी 10 अंश सेल्सिअस इतके जास्त नोंदविले गेले. हे तापमान तेथील सरासरीपेक्षाही कितीतरी जास्त होतेे. यामुळे तेथील उष्णतेचे आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडले गेले. यापूर्वी तेथील तापमान सरासरीपेक्षा 27 अंश सेल्सिअस इतके जास्त नोंदविले गेले होते. ही आकडेवारी पाहून अमेरिकेचे नॅशनल स्नो अँड आयएस डेटा सेंटरचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी सरासरी तापमानात वाढ झालेल्या आर्क्टिकवर आपली नजर केंद्रित केली आहे. मार्चमध्ये इतकी उष्णता पडणे ही असामान्य बाब आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर वेगळवेगळे हवामान असते; मात्र हे दोन्ही बर्फाच्छादित ध्रुव एकाचवेळी वितळत आहेत. ही बाब निश्चितपणे चकित करणारी आहे. याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यता आहे.
ध्रुवीय भागात वाढलेले तापमान हे जल-वायू परिवर्तनमुळे की आणखी कोणत्या कारणामुळे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, पृथ्वीच्या अन्य भागांच्या तुलनेत ध्रुवीय भाग वेगाने गरम होत आहेत. यामुळे तेथील बर्फ वितळण्याचा वेगही वाढत चालला आहे. उल्लेखनीय म्हणजे अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या रूपात इतके पाणी आहे की, ते वितळल्यास समुद्राची पातळी 200 फुटांपर्यंत वाढू शकते. 'नेचर' पत्रिकेतील माहितीनुसार 1880 नंतर समुद्राच्या पातळीत सरासरी 9 इंचांनी वाढ झाली आहे.