‘या’ लघुग्रहाला आहेत तीन चंद्र!

Moon
Moon

बँकॉक : एखाद्या ग्रहाला अनेक चंद्र असणे ही काही नवलाईची बाब नाही. शनी आणि गुरूसारख्या ग्रहांना तर सत्तरपेक्षाही अधिक चंद्र आहेत. मात्र, आता संशोधकांनी एका लघुग्रहाच्या तीन चंद्रांचा शोध लावला आहे. या अवकाशीय शिळेची रुंदी 257 किलोमीटर असून तिचा शोध 19 व्या शतकातच लागला होता. आता त्याला तीन चंद्र असल्याचे दिसून आले आहे.

हा लघुग्रह आता 'क्‍वाड्रपल सिस्टीम' असलेला पहिला लघुग्रह ठरला आहे. त्याला एका ग्रीस देवतेच्या नावावरून '130 इलेक्ट्रा' असे नाव देण्यात आले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत 11 लाख लघुग्रहांचा शोध घेतला आहे. मात्र, एखाद्या लघुग्रहाभोवती फिरणारे असे तीन-तीन चंद्रही असतात हे माहिती नव्हते. या अकरा लाख लघुग्रहांपैकी 150 लघुग्रहांना किमान एक चंद्र आहे. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान असलेल्या 'अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट'मध्ये अनेक लघुग्रह आहेत. याच पट्ट्यात सन 1873 मध्ये या लघुग्रहाचा शोध लावण्यात आला होता.

त्यानंतर 130 वर्षांनी इलेक्ट्राच्या पहिल्या चंद्राचा शोध लागला. 2014 मध्ये त्याच्या दुसर्‍या चंद्राचे पुरावे मिळाले. आता त्याला आणखी एक चंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. थायलंडच्या नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने हा दुर्मीळ शोध लावला आहे. तेथील संशोधकांनी म्हटले आहे की इलेक्ट्राचा पहिला चंद्र 6 किलोमीटर, दुसरा 2 किलोमीटर आणि अलीकडेच शोधलेला तिसरा चंद्र 1.6 किलोमीटर रुंदीचा आहे. हा नवा चंद्र लघुग्रहापासून 340 किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा घालत आहे.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news