भौगोलिक स्थितीनुसार बदलतो डोळ्यांचा आकार | पुढारी

भौगोलिक स्थितीनुसार बदलतो डोळ्यांचा आकार

न्यूयॉर्क : जगभरात वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीत राहणार्‍या लोकांच्या डोळ्यांचा आकारही वेगवेगळा असल्याचे दिसून येत असते. मंगोलियन वंशाच्या लोकांचे डोळे बारीक असतात तर आफ्रिकन वंशाच्या लोकांचे डोळे मोठे असतात. यामागील कारण काय असावे याबाबत अनेकांना कुतुहल वाटत असते.

मानवी डोळ्यांच्या आकाराबाबत संशोधकांनी आतापर्यंत वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. एका सिद्धांतानुसार, डोळ्यावरील पापणीच्या भागात असलेल्या त्वचेखाली चरबी साठलेली असते. या साठलेल्या चरबीमुळेच डोळ्याचा आकार निश्चित होत असतो. दुसर्‍या एका सिद्धांतानुसार सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे (अल्ट्राव्हायोलेट रेज) ही भौगोलिक स्थितीनुसार डोळ्यांचा आकार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

‘सायन्स फोकस’ या नियतकालिकातील माहितीनुसार पूर्व आशियाई, आग्नेय आशिया, पॉलिनेशियन म्हणजेच पॅसिफिक महासागरातील बेटांवरील रहिवासी तसेच अमेरिकेतील मूळ रहिवासी लोकांच्या डोळ्यांमध्ये असणारा फरक स्पष्टपणे दिसून येतो. काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास डोळ्यांच्या वरील पापणीच्या भागामुळे त्यांच्या संरचनेत हा फरक दिसतो. कोणत्या व्यक्तीचे डोळे कसे असावेत ही बाब पापणीचा भाग ठरवतो.

एका सिद्धांतानुसार, आपले पूर्वज कोणत्या हवामानाच्या प्रदेशात राहिले त्यावरही आपल्या डोळ्यांचा आकार अवलंबून असतो. उदाहरणार्थ, थंड आणि उष्ण ठिकाणी जन्मलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांवर तेथील हवामानाचा थेट परिणाम झाल्याचे दिसून आले. थंडी, अतिनील किरणे आणि वाळवंटातील उष्णतेचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो व त्यामुळे त्यांचा आकार बदलतो असे तज्ज्ञांना वाटते. केवळ डोळ्यांवरच नव्हे तर शरीरातील अन्य अवयवांवरही असा परिणाम होत असतो. शरीरावर परिणाम करणारे हे जीन्स म्हणजेच जनुके एका पिढीतून दुसर्‍या पिढीत जातात.

Back to top button