

लंडन : ब्रिटिश रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने म्हटले आहे की पृथ्वीपासून 117 प्रकाशवर्ष अंतरावर जीवसृष्टीला अनुकूल अशा ग्रहाचा शोध लावण्यात आला आहे. हा ग्रह त्याच्या तार्यापासून योग्य अंतरावर असल्याने तेथील तापमान द्रवरूप पाण्याला धारण करण्यासाठी अनुकूल आहे. हा ग्रह एका खुजा, सफेद तार्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील जेय फारिही यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की आमच्या टीमसाठी या ग्रहाचा शोध आश्चर्यकारक असाच होता. जर या ग्रहाबाबतच्या संशोधनाची पुष्टी झाली तर प्रथमच एखाद्या सफेद खुजा तार्याभोवती फिरणार्या ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेतला जाऊ शकतो. ज्यावेळी एखाद्या नव्या ग्रहाचा शोध लावण्यात येतो, त्यावेळी याद़ृष्टीने जरूर संशोधन होत असते.
एक दिवस आपला सूर्यही अशाच प्रकारच्या सफेद खुजा तार्यामध्ये रूपांतरीत होईल. आणखी काही अब्ज वर्षांनी तो एक लाल विशालकाय आकृतीमध्ये रूपांतरीत होईल आणि नंतर शेजारच्या बुध व शुक्राशी सहयोग बंद करील. अखेरीस त्याचे रूपांतर थंड, सफेद खुजा तार्यामध्ये होईल.
एखाद्या ग्रहावर जीवसृष्टीला अनुकूल स्थिती असण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. त्याचा पृष्ठभाग ठोस, खडकाळ असावा लागतो व तो गुरूसारख्या ग्रहांप्रमाणे निव्वळ वायूचा गोळा असून चालत नाही. अशा ग्रहाचे त्याच्या तार्यापासूनचे अंतर योग्य असावे लागते जेणेकरून ग्रहावरील तापमानही योग्य राहील. तिसरे म्हणजे अशा ग्रहावर पाण्याचे अस्तित्व असावे लागते. या तीन गोष्टी असतील तर तेथील जीवसृष्टीची शक्यता वाढते असे मानले जाते.