

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बदलती जीवनशैली, ताणतणाव, लग्नाचे वाढलेले वय, उशिरा होणारी गर्भधारणा अशा अनेक कारणांमुळे गर्भाशयात स्नायूंच्या गाठी होण्याचे प्रमाण वाढले आहे. साधारणपणे 30-40 वर्षे वयाच्या महिलांमध्ये गाठींची अर्थात फायब्रॉइड्ससची समस्या जाणवते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान रक्तस्रावाचे प्रमाणही वाढते. अनेक महिलांमध्ये समस्येचे निदानच झालेले नाही.
गर्भाशयातील फायब्रॉइड्सना लेओमायोमास किंवा मायोमासदेखील म्हटले जाते. गर्भाशयातील स्नायूंच्या गाठी कर्करोगाच्या असल्याचा गैरसमज महिलांमध्ये पाहायला मिळतो. मात्र, अशी परिस्थिती क्वचितच आढळून येते. फायब्रॉइडच्या लक्षणांमध्ये मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे, मूत्राशयावर दाब येणे, कंबर दुखणे, बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे, 7 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारी मासिक पाळी, रक्ताच्या गुठळ्या आणि अति रक्तस्राव यांचा समावेश होतो. गर्भाशयातील फायब्रॉइड्स जीवघेणे नसतात; परंतु जास्त रक्तस्रावामुळे थकवा येऊ शकतो. महिलांना नैराश्य, चिंता, तणाव आणि भीतीचाही सामना करावा लागू शकतो. बर्याच स्त्रिया समस्येचे निराकरण करण्यासाठी हिस्टरेक्टॉमीचा पर्याय निवडतात. मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
फायब्रॉइड्सचे निदान न झालेल्या महिलांची संख्या अधिक आहे. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत फायब्रॉइडच्या रुग्णांमध्ये 50% वाढ झाली आहे. 30 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील बहुतेक महिलांना ही समस्या सतावते आहे. ओपीडीमध्ये येणार्या 25% स्त्रियांनाफायब्रॉड्समुळे तीव्र रक्तस्राव होतो. महिन्याला 200-250 रुग्ण फायब्रॉइड्सची तक्रार घेऊन दाखल होतात.
– डॉ पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ
हार्मोनचे असंतुलन, अनुवांशिकता हे घटक फायब्रॉइड्ससाठी कारणीभूत ठरू शकतात. लठ्ठपणा, फळे आणि भाज्यांचे सेवन कमी करणे यामुळे फायब्रॉइड्चा धोका वाढू शकतो. त्यामुळे महिलांनी जीवनशैलीबाबत, आहार आणि व्यायामाबाबत सजग राहणे आवश्यक आहे.
– डॉ. सुप्रिया पुराणिक, फर्टिलिटी अँड सीनियर कन्सल्टंट
हेही वाचा