

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये (Union Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केली आहे. (infrastructure sector) पुढील आर्थिक वर्षात रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीत सुधारणा करण्यासाठी ५० अतिरिक्त विमानतळे, हेलिपॅड्स, वॉटर एरो ड्रोन, अत्याधुनिक लँडिंग ग्राउंड्सचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
मागील काही वर्षांच्या आर्थिक आव्हानांच्या कालावधीत पायाभूत सुविधा क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा पुनर्प्राप्ती आणि वाढीचा मुख्य आधार होता. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट निर्माण झाले होते. पायाभूत सुविधा क्षेत्राच्या मजबुतीमुळे अर्थव्यवस्थेला या संकटाचा सामना करण्यास मदत झाली. गेल्या काही वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा क्षेत्र हे धोरणात्मक घोषणा आणि निधी वाटपाच्या केंद्रस्थानी राहिले आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्रात सिमेंट हा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे. त्यावर २८ टक्के जीएसटी लागू आहे. सिमेंटची वाढलेली किंमत ही या क्षेत्राच्या वाढीसाठी मोठी अडचण आहे. त्याचप्रमाणे आयर्न आणि स्टील यांसारख्या इतर अनेक सामग्रीवर जीएसटी अंतर्गत जास्त कर आकारला जातो. हा जीएसटी कमी केल्यास उद्योगांना प्रकल्पांची किंमत कमी करण्यास आणि प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्यास मदत होईल. पायाभूत सुविधा क्षेत्राच्या संपूर्ण वाढीसाठी जीएसटीचे तर्कसंगतीकरण करण्याची मागणी या क्षेत्राकडून करण्यात आली होती. (Union Budget 2023)
हे ही वाचा :