सिंधुदुर्ग : राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाला कोरोनाचा फटका!

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे एकुण 2 हजार 874 उद्दिष्टापैकी मार्च अखेर 1 हजार 333 शस्त्रक्रिया पूर्ण करून सरासरी 46.38 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये 9 पुरुष शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुभार्व व वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्‍तपदे यामुळे उद्दिष्टपूर्ती पूर्ण झाली नसल्याचे डॉ. खलीपे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मात्र गेले दोन वर्ष उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कार्यरत राहिली. तसेच सर्वसामान्य जनतेमध्येही कोरोना महामारीची भीती होती. याचा परिणाम कुटुंब नियोजन कार्यक्रमावर दिसून आला. तरीही आरोग्य कर्मचारी व आशा यांनी कुटुंब नियोजनसाठी अनेक जोडप्याना प्रवृत केल्यामुळे जानेवारी 2022 अखेर पर्यत एकूण उद्दिष्टाच्या 46.38 टक्के एवढे काम झाल्याचे डॉ. खलीपे म्हणाले.

जिल्ह्यासाठी एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे एकूण 2 हजार 874 एवढे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाची पूर्तता करताना मार्च अखेर पुरुष शस्त्रक्रिया 9 आणि स्त्री शस्त्रक्रिया 1 हजार 324 अशा एकूण 1 हजार 333 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्ह्यात कोरोनाचे सावट, त्यातच वैद्यकीय अधिकार्‍याची असलेली मोठ्या प्रमाणातील रिक्‍त पदे याचा कुटुंब नियोजन कार्यक्रमांवर परिणाम जाणवला. तरीही जिल्ह्यात जास्तीत जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात आले परंतु उद्दिष्टाची पूर्तता झाली नाही. जिल्हयाची लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्याला मिळणारे उद्दिष्ट मोठे आहे. जिल्ह्याचा जन्मदरही घटत आहे. त्यामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मार्च 2022 अखेरच्या अहवालानुसार कुडाळ 522 उद्दिष्टांपैकी 268 (51.34 टक्के) पूर्ण, मालवण 370 उद्दिष्टांपैकी 187 (50.54 टक्के) पूर्ण, सावंतवाडी 485 उद्दिष्टांपैकी 248 (51.13 टक्के) पूर्ण, कणकवली 465 उद्दिष्टांपैकी 191 (41.08 टक्के) पूर्ण, देवगड 395 उद्दिष्टांपैकी 196 (49.62 टक्के) पूर्ण, वैभववाडी 145 उद्दिष्टांपैकी 74 (51.03 टक्के) पूर्ण, वेंगुर्ला 300 उद्दिष्टांपैकी 124 (41.33 टक्के) पूर्ण, दोडामार्ग 192 उद्दिष्टांपैकी 45 (23.44 टक्के) पूर्ण, अशाप्रकारे जिल्ह्यात 2 हजार 874 उद्दिष्टांपैकी 1 हजार 333 शस्त्रक्रिया पूर्ण करून 46.38 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. महेश खलीपे यांनी दिली.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news