‘महाराष्ट्र केसरी’ची गदा आणली; पुढे काय..? | पुढारी

‘महाराष्ट्र केसरी’ची गदा आणली; पुढे काय..?

कोल्हापूर : सागर यादव

तब्बल 22 वर्षांचा दुष्काळ संपवत देवठाणे (ता. पन्हाळा) येथील पै. पृथ्वीराज पाटील याने कोल्हापूरला ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा मिळवून दिली. यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील दमदार कामगिरीच्या जोरावर पृथ्वीराजने भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून नोकरीही मिळविली आहे. सध्या त्याच्यावर सत्कार आणि बक्षिसांचा वर्षावही सुरू आहे; पण मैदान गाजविणार्‍या पृथ्वीराजसारख्या अनेक मल्लांच्या करिअर आणि योग्य सन्मानासाठी राज्य सरकारचे दुर्लक्षच होत असल्याचे वास्तव आहे.

पृथ्वीराजसह कोल्हापुरातील अनेक तालमींतील मल्लांनी या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. यामुळे राजर्षी शाहूंनी निर्माण केलेल्या कुस्तीपंढरीला आलेली मरगळ झटकली गेली आहे. यामुळे नवोदित मल्लांना प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्याकडून भविष्यात उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा निर्माण झाली आहे. दुसरीकडे, प्रतिकूल परिस्थिती, मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही खडतर प्रवासातून खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून आपले गाव-जिल्हा-राज्य आणि देशाचे नाव चमकवत आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पुढील वाटचालीस पाठबळ देण्याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासन उदासीन असल्याचे वास्तव आहे.

हक्काचे मानधनही वेळेत मिळत नाही

महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यासह राज्य-राष्ट्रीय पातळीवरील किताब पटकावणार्‍या पैलवानांसह विविध खेळांत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणार्‍या खेळाडू, ज्येष्ठ प्रशिक्षकांना शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, हे मानधनही वेळेत मिळत नसल्याचे वास्तव आहे. चार-पाच महिन्यांपर्यंत हे मानधन रखडते. हक्काचे मानधन वेळेत मिळत नसल्याने खेळाडू-प्रशिक्षकांना उदरनिर्वाहासाठी पर्याय शोधावा लागतो.

अन्य राज्यांचा आदर्श घ्यावा

देशातील अन्य राज्यांत खेळाडूंसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. यामुळे तेथून अनेक नामवंत खेळाडू सातत्याने घडत आहेत. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय-राज्य स्पर्धा गाजवणार्‍या खेळाडूंना उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, पीएसआय अशा विविध सरकारी नोकर्‍या दिल्या जातात. यामुळे त्यांच्या करिअरचा प्रश्न मार्गी लागल्याने खेळातील सर्वोच्च पदकासाठी त्यांच्याकडून सर्वोच्च प्रयत्न केले जातात. याउलट महाराष्ट्रात खेळाडूंसाठी अशा योजनांचा अभाव आहे. अनेक योजनांसाठी विविध अटी-शर्तींमुळे खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. यामुळे साहजिकच त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो आणि त्यांना क्रीडा क्षेत्र सोडून नोकरीच्या मागे पळावे लागते.

राज्यात सलग तीनवेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावणार्‍या खेळाडूंची डीवायएसपीपदी नियुक्ती केली जाते. 60 वर्षांत केवळ तिघांनाच यातून संधी मिळाली आहे. यात तिहेरी महाराष्ट्र केसरी नृसिंह यादव व विजय चौधरी यांना, तर हिंद केसरी सुनील साळोखे यांचा समावेश आहे. सलग तीन वर्षांच्या विजेतेपदाच्या नियमांमुळे अनेक मल्लांची उमेदीची वर्षे वाया गेली आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे कुस्ती थांबल्याचा मोठा परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र केसरी किताब पटकावणार्‍या मल्लांना पीएसआय, तर इतर गटात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या मल्लांना कॉन्स्टेबल म्हणून पोलिस दलात नोकरी मिळणे गरजेचे आहे. याशिवाय हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल व ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच ते वेळच्या वेळी मिळणे अत्यावश्यक आहे.
– पै. अमृत भोसले, सदस्य, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

Back to top button