पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी लाडू प्रसाद केंद्र सुरू

विठ्ठल रूक्मिणी www.pudharinews.
विठ्ठल रूक्मिणी www.pudharinews.

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणार्‍या भाविकांना अल्पदरात बुंदी लाडू व राजगीरा लाडू प्रसाद उपलब्ध व्हावा, यासाठी मंदिर समितीच्यावतीने लाडू प्रसाद विक्री पुन्हा 1 जुलैपासून सुरू केली आहे. बुंदी लाडू पाकीट 20 रुपये, तर राजगीरा लाडू पाकीट 10 रुपयांना विक्री करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह. अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'श्रीं'चा लाडू प्रसाद बंद करण्यात आला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर मंदिर समितीने लाडू प्रसाद खरेदी कामाची विहित प्रक्रिया पूर्ण करून दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक सहकारी संस्था मर्या; नाशिक यांना लाडू प्रसादाचा ठेका देण्यात आला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना दोन वर्षांनंतर लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. आषाढी यात्रा कालावधीत 3 ते 4 लाख पाकीट बुंदी लाडू, तर 1 लाख पाकीट राजगीरा लाडू प्रसाद उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. लाडू प्रसाद हा भाविकांच्या श्रद्धेचा व भावनेचा भाग आहे. लाडू प्रसाद सुरू झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

लाडू प्रसाद केंद्राचे उद्घाटन मंदिर समितीचे सह. अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजी मोरे, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभागप्रमुख राजेश पिटले तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

लाडू प्रसाद केंद्रावर बुंदी लाडू व राजगीरा असे दोन प्रकारचे लाडू भाविकांना विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. रिफाईंड शेंगदाणा तेलातील बुंदी लाडू प्रसाद (एक लाडू प्रति 70 ग्रॅम याप्रमाणे दोन लाडूंचे पॅकेट) 20 रुपये, तर राजगीरा लाडू प्रसाद (एक लाडू प्रति 25 ग्रॅम याप्रमाणे दोन लाडूंचे पॅकेट) रु.10 प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
– ह.भ.प. गहिनीनाथ महाराज महाराज औसेकर, सहअध्यक्ष

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news