

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तळीये दुर्घटना घडल्यानंतर सरकारला अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत. याच संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळीये गावतील दुर्घटनेबाबत माहिती दिली. शासनाकडून दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते, त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते, मात्र रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पवार झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
पवार म्हणाले, जोरदार पावसामुळे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागांना फटका बसला. जागतिक तापमानवाढीमुळे हा फटका असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून ७६ जणांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाली आहेत. ५९ जण बेपत्ता आहेत, ७५ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. २१ एनडीआरएफची पथक कार्यरत असून इतर १४ पथके यात आर्मी नेव्हीची आहे. या सर्वांच्या एकूण ५९ बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. तब्बल ९० हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यश मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील काही भागात पूरात अडकलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था व्हावी. जेवण, स्वच्छ पाणी त्यांना पुरवणे सध्या गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर तांदूळ, डाळ, रॉकेल आणि शिव भोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : रंकाळा १६ वर्षानंतर ओव्हरफ्लो