पैशांचा पाऊस : ५२ लाखांचा गंडा !; भोंदू मांत्रिकाला गुन्हे शाखेने जालन्यात केली अटक

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पैशांचा पाऊस पाडून देण्याच्या बहाण्याने जालना जिल्ह्यातील मांत्रिकाने शहरातील एका सावकाराला एक नव्हे…दोन नव्हे… तर तब्बल 52 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सापळा रचून मांत्रिकाला बेड्या  ठोकल्या आहेत. किसन आसाराम पवार (वय 41, रा. हिवरखेड, ता. मंठा, जि. जालना) असे या मांत्रिकाचे नाव आहे. याप्रकरणी धायरीतील गणेशनगर येथील 40 वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांना त्यांच्या एका मित्राने जालन्यातील  मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत असल्याची माहिती दिली. पवार हा नेहमी पुण्यात येत असे. 2016 च्या दरम्यान फिर्यादी यांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आपल्याला छोटीशी पूजा करावी लागेल. त्यासाठी काही पैसे पूजेत ठेवावे लागतील, असे त्याने सांगितले. मित्राचे म्हणणे आणि पवार याचा अविर्भाव पाहून फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला. फिर्यादीने त्याला वेळोवेळी थोडे थोडे करून तब्बल 52 लाख 1 हजार रुपये दिले. तरी त्यांना पैशाच्या पावसाची प्रचिती आली नाही. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देणे बंद केले.

त्यानंतर नुकतेच पवार याने तुमचे काम झाले आहे. परंतु एक शेवटचा विधी राहिला आहे, तो करावा लागेल, असे सांगितले. त्याचा फिर्यादी यांना मानसिक धक्का बसला. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पवार याची माहिती घेतल्यावर तो जालना जिल्ह्यातील गावी असल्याचे समजले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक बनावट ग्राहक तयार केला. त्याबाबत खात्री पटल्यावर छापा टाकून पवार व त्याने वापरलेले सर्व साहित्य ताब्यात घेतले. यानंतर त्याला पुण्याला आणून अटक करण्यात आली. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news