ट्रेकिंग : विवेक दाभोळे
साहसाला आव्हान देणार्या सह्याद्रीच्या जंगलात आणि पत्थरदिल काळ्या पत्थराशी खेळण्यासाठी तेवढेच वाघाचे काळीज पाहिजे. जिंदादिल मन, मनगट आणि मेंदू दणकट असणार्या तरुणाईनेच ट्रेकिंगचा नाद करावा..! ज्यावरुन खाली केवळ पाण्याचा प्रवाहच उतरू शकतो आणि बेलाग कड्यावर जाण्याची हिंमत फक्त वार्यातच आहे, अशा सह्याद्री पर्वताच्या रांगा सळसळत्या तरुणाईला ट्रेकिंगसाठी आव्हान देतात. नादखुळा ट्रेकिंगच्या धाडसाला वाव देणारे आणि छंदाची हौस भागविणार्या गडकोट, दर्याखोर्या, पुणे-रायगड जिल्ह्यातील आडवाटेच्या घाटवाटा या उन्हाळ्यात चालून गेला तर सह्याद्रीचे रौद्र रुप अनुभवता येईल. दक्षिणेकडील पारगड, मुडागडापासून ते बारा मावळातील राजमाची, कोराईगडापासून ते बोरघाटाखाली कर्जतजवळील समरखिंडीपर्यंतच्या अनेक जंगलवाटा, डोंगरवाटा ट्रेकवेड्यांसाठी सज्ज आहेत.
किंगची आवड असणारा तरुणच या जंगलवाटेचा नाद निभावू शकतो. वाळवा तालुक्यातील बागणी येथे वारणा ट्रेकर्स अॅण्ड् अॅडव्हेंचर्सच्या जिगरबाज तरुणांनी सात आठ वर्षांपासून ट्रेकिंगचा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. चांदोलीच्या छाती दडपून टाकणार्या निबीड जंगलात तहानभूक विसरुन फिरताना निसर्गाचे रौद्ररुप काय असते याची अनुभूूती मिळते.
घनदाट आणि निबीड जंगलात टे्रकिंगचा थरार खरोखरच अनुभवायचा असेल, जीवघेणे धाडस करण्याची तयारी असेल तर सुसाट निघा अन् गाठा थेट चांदोलीचे जंगल! जिल्ह्यातच चांदोलीचे जंगल, पूर्वेला दंडोबाची डोंगररांग, घाटमाथ्यावर बाणूरगड, सागरेश्वर तरुणाईला खुणावू लागते. दुर्गम भागातील प्रचितगडाकडे जाण्याचा बेत मात्र वनविभागाची परवानगी घेऊनच आखावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यातून संगमेश्वर पासून पूर्वेला पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नायरीकडून या गडाची स्वारी करता येते. मात्र हा रुट विलक्षण अवघड ठरतो! याच दुर्गम भागात कंदाहारचा डोह आहे. आता वैशाख वणव्यात कोरडा असला तरी डोहाची रौद्रभीषणता छाती दडपून टाकल्याखेरीज राहत नाही. हा सारा भाग कमालीचा दुर्गम आहे. नशीब जोरावर असले तर एखादा गवा देखील दर्शन दिल्याखेरीज राहणार नाही. मात्र बिथरलेल्या गव्यापेक्षा 'चांदोली'च्या जंगलात अन्य दुसरे काही वाईट नाही याचे देखील भान राखा. चांदोलीच्या जंगलातील झोळंबीचा सडा, मणदूर-येळपूरची खिंडवाट सारेच जंगल निवांतपणे एकदा तरी तुडवाच!
बारा मावळाच्या अलीकडून म्हणजे भोरपासून खाली समरखिंडीपर्यंत ऐसपैस पसरलेल्या बारा मावळाची वाट ट्रेकवेड्यांसाठी जणू तीर्थयात्राच! दाट जंगल, भिरभिरता गार वारा..! नादखुळा ट्रेकसाठी आणखी काय हवे..! भोर वरंधा घाटापासून पुढे लोणावळा, खंडाळा करत माळशेजपर्यंत हवे तिथे जा! उंच डोंगर, डोळे फिरविणार्या खोल दर्या यात फिरताना मात्र काळजीची गरज अधिक!
गडकोट म्हणजे तर अवघ्या तरुणाईचा जणू पंचप्राण! बारा मावळातील गडकोटांचे वैभव सुट्टीत अवश्य पहा! लोणावळ्याच्या वायव्येस 15 कि. मी. अंतरावर राजमाची गड आहे. खरेतर हा ट्रेक पावसाळ्यात देखील कराच…पण खास आठवणीसाठी म्हणून उन्हाळी सुट्टीसाठी हा रुट केवळ अविस्मरणीय ठरतो.
महाबळेश्वरच्या डोंगररांगेतील केंजळगड हा गिरीदुर्ग तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला वाई आणि रायरेश्वर दरम्यान रोहिड्याच्या डोंगररांगेत वसला आहे. भोरहून बसने आंबवड्याला उतरून कोर्ल्याला पायी जाता येते. कोर्ल्यापून दीड तासाची गडाची वाट राहते. वाईमार्गे देखील गडावर येण्यासाठी एक मार्ग आहे. वाईहून खावली गावातून उजवीकडे गडावर जाणारा रस्ता लागतो. पुढे अर्धा – एक तासात आपण गडावर येतो. रायरेश्वरच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडे शेताच्या बांधावरून उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्वरला जोडणारी डोंगररांग दिसते. मात्र आता गडावरील तळ्यातील पाण्याने तळ गाठला असेल.
'गरुडाचे घरटे' ही उपमा सार्थ ठरविणारा तोरणा गड चढण्यासारखा धडाकेबाज अनुभव कदाचित दुसरा कोणता नसावा. पुुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात सह्याद्री रांगेत तोरणा व राजगड वसलेले आहेत. वेल्हा येथे जाण्यासाठी मुंबई – बंगलोर हायवे ( क्र. 4) वरील पुण्याजवळील नसरापूर फाटा येथे उतरावे. नसरापूर ते वेल्हे अंतर 29 किमी आहे. तोरणा गड ते राजगड हा ट्रेक अतिशय कसोटीचा ठरतो. 'राजियांचा गड..गडांचा राजिया' असा लौकिक असलेला राजगड तर कमालीचा दुर्गम! राजगडाचा केवळ बालेकिल्लाच तोरणापेक्षा मोठा आहे. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. राजगड हा अतिशय उंच आहे. त्याच्या मजबुतीची तर कल्पनाही करवत नाही.
सह्याद्रीत भोर ते महाबळेश्वर हा डोंगरमार्ग आहे. रोहीड खोर्यातील किल्ले रोहीडा हा एक वेगळा गड आहे. पाचगणीच्या टेबललॅन्डपेक्षाही उंच आणि लांब टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून 8 किमी अंतरावर असणारे हे रायरीचे पठार सांगलीतून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दर्या, उंच सुळके, पठारे, लांबच लांब डोंगर सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर दुर्गम ठरतो.
रायरेश्वराचे पठार हे 5 ते 6 किमी पसरलेले आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सारा नजारा येथून दिसतो. रायरेश्वराकडे जाताना आधी भोर गावातून जावे लागते.
वरंध्याच्या जंगलातील गिरीदुर्ग मोहनगड उर्फ दुर्गाडीचा किल्ल्याची वाट एका दिवसात चालता येते. कावळ्या घाट असो वा सिंगापूर नाळ, बोराट्याची नाळ, निसणीची वाट या अनेक घाट वाटा आहेत. या घाटवाटांनी आपले असे वैशिष्ट्य जपले आहे. या वाटेतीलच एक घाटवाट म्हणजे वरंधा घाटाची वाट होय. या गडाच्या पायथ्याशी दुर्गाडी गाव आहे. या नावावरुनच दुर्गाडी किल्ला असे नाव पडले. या गडावरुन राजगड, तोरणा, रायगड, प्रतापगड, कावळा किल्ला दिसतात. वरंधा घाटाने 10 किलोमीटर गेल्यावर पुढे दुर्गाडी फाटा लागतो. हा सारा परिसर ट्रेकिंगची हौस भागविणारा ठरतो.
Tags : trekking youth