सोलापूर : जिल्हा परिषद सभेतील सर्व विषय मंजूर

सोलापूर : जिल्हा परिषद सभेतील सर्व विषय मंजूर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाईन प्रणालीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेपुढील सर्व विषय मंजूर करण्यात आल्याचा दावा जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी केला. तर जि.प.सदस्यांनी या सभेत केवळ एक विषय मंजूर करण्यात आला असून उर्वरित विषयावर बुधवारी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे या सभेवरुन संशयकल्लोळ व्यक्त होत आहे. कोरोना निर्बंधामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होती. या सभेसाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात व्हिडीओ कॉन्फरसने अध्यक्ष कांबळे, सीईओ स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी उपस्थिती दर्शविली.

तर 14 सदस्यांनी पंचायत समितीच्या ठिकाणावरुन ऑनलाईन प्रणालीने हजेरी लावली. ऑनलाईन प्रणालीने आयोजित केलेल्या सभेत काहीच समजत नसल्याने सभा ऑफलाईन घेण्यात यावी, अशी मागणी सभा सुरु होण्यापूर्वी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अनिल मोटे, सदस्य आनंद तानवडे, भारतआबा शिंदे, प्रा.सुभाष माने, त्रिभुवन धाईंजे, नितीन नकाते, अतुल खरात, मल्लीकार्जून पाटील आदींनी सीईओ स्वामी यांच्याकडे सभा ऑफलाईन घेण्याची विनंती केली. मात्र, सीईओ स्वामी यांनी अध्यक्ष कांबळे यांच्याकडे इशारा केला. जिल्हाधिकार्‍यांनी ऑफलाईन सभेसाठी परवानगी नाकारल्याने सभा ऑनलाईनच घेणे आवश्यक असल्याचे यावेळी अध्यक्ष कांबळे यांनी सदस्यांना सांगत स्वामी यांच्या दालनातून बाहेर पडले. त्यानंतर ते मागच्या दारातून पुन्हा प्रवेश करून ऑनलाईन सभेला हजेरी लावली. दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत ऑनलाईन सभा सुरू ठेवण्यात आली. यावेळी सदस्यांना आवाज येत नसल्याने त्यांनी ऑनलाईन सभेवर आक्षेप घेतला. त्यामुळे बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष कांबळे यांनी दिली.

सभेच्या सुरुवातीला ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्त रणजित डिसले यांचा विषय प्रा.सुभाष माने यांनी उपस्थित करून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. डिसले गुरुजी हे ग्रामविकास खात्याचे कर्मचारी आहेत. शिक्षणमंत्र्यांना याप्रकरणात कायदेशीर अधिकार नाही अशी भूमिका प्रा.माने यांनी घेतली. डिसले गुरुजी यांची भूमिका चुकीची ठरली आहे. प्रशासनाची भूमिका योग्य होती. प्रशासनच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोना परिस्थितीमुळे जि.प.सेस फंडाच्या निधीतील 60 टक्के निधी खर्च करण्याचे निर्बंध होते.हे निर्बंध कमी झाल्याने शंभर टक्के निधी खर्च करण्यास सभेत मंजूरी देण्यात आली.

ऑफलाईन सभेसाठी सदस्य झाले आक्रमक

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन प्रणालीने सभागृहातच घेण्यात यावे यासाठी जि.प.सदस्य शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाले होते. जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांच्या दालनातून ऑनलाईन सभेसाठी हजर होण्यासाठी जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे आल्यानंतर सदस्यांनी त्यांना सभा ऑफलाईनच घ्यावी असा आग्रह धरला.

अन् अध्यक्षांनी दिला सदस्यांना चकवा

जिल्हा परिषदेची सभा सभागृहातच घेण्यात यावी यासाठी जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांना सदस्यांनी जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांच्या दालनात घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष कांबळे सदस्यांना चकवा देत मागच्या दारातून पुन्हा दालनात प्रवेश करीत ऑनलाईन सभा घेतलीच.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news