बंडातात्या कराडकरांना अखेर उपरती : आधी दंडवत आंदोलन; नंतर लोटांगण, माफीनामा सादर | पुढारी

बंडातात्या कराडकरांना अखेर उपरती : आधी दंडवत आंदोलन; नंतर लोटांगण, माफीनामा सादर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यावर गुरुवारच्या ‘दंडवत’ आंदोलनानंतर शुक्रवारीच ‘घालीन लोटांगण…’ अशी वेळ आली. गुरुवारी खा. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्यासह काही खासदार, आमदार व मंत्री यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपरती झाली. माफीनामा सादर करणार्‍या त्यांच्या व्हिडीओ क्‍लिप दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

सातारा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दोन गुन्हेही दाखल झाले. त्यामुळे बंडातात्यांना पोलिस ठाण्यात हजर व्हावे लागले. सव्वा दोन तासांची कसून चौकशीही झाली. महिला आयोगाने नोटीस धाडली, तर सातार्‍यात महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाचा एल्गार पुकारला. कराडातही विविध घटकांतील मान्यवरांनी निषेध केला. या घटनांनी दिवसभर वातावरण चांगलेच तापले.

राज्य शासनाच्या वाईन विक्री धोरणाविरोधात व्यसनमुक्‍त युवक संघ महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवारी सातार्‍यात दंडुका दंडवत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी खळबळ उडवून देणारी विधाने केली होती. ‘शासनाचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, असे आहे. त्यातला ढवळ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्यांना त्यांचा जास्त गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे पवळा’, अशी टिका करणार्‍या बंडातात्यांची जीभ आणखी घसरत गेली होती.

‘सुप्रिया सुळे व पंकजा मुंडे या दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटोदेखील आहेत’, अशी खालच्या पातळीवरील वक्‍तव्ये बंडातात्यांनी केली होती. सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील व माजी सहकार मंत्री पतंगराव कदम यांच्या चिरंजीवांवरही त्यांनी आरोप केले. बंडातात्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टिकेची झोड उठू लागली. त्यामुळे आक्षेपार्ह वक्‍तव्य करणार्‍या बंडातात्यांनी शुक्रवारी मात्र ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला.

नरमाईची भुमिका घेत त्यांनी जर माझं वक्तव्य चुकलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे. त्यात कमीपणा कसला? असे सांगत माफीनामा सादर केला आणि माध्यमांवर खापर फोडले. शुक्रवारी मात्र माध्यमांशी बोलताना बंडातात्यांनी ‘सुप्रियाताई, पंकजाताई अत्यंत निर्व्यसनी आहेत. मी ऐकिव माहितीवर बोललो, त्याला कोणताही आधार नव्हता. त्या अत्यंत सदाचारी आहेत, असे जाहीर करुन टाकले.

आंदोलनावेळी बोलण्याच्या ओघामध्ये मी अनावधानाने काही राजकीय लोकांची नावे घेतली. त्यांच्यावर काही आरोप केले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्‍त करतो, असेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले. दिवसभर ही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होती. कराडचे आमदार बाळासाहेबांच्या जिरंजीवाबाबत अनावधानाने बोललो असून ते नेहमी माझ्यासोबत दिंडीला येतात, असा खुलासाही बंडातात्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही निषेध नोंदवत सातारा पोलिसांना बंडातात्या यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल लेखी खुलासा महिला आयोगाकडे करावा, अशी नोटीसदेखील धाडली. सातारा पोलिसांना याप्रकरणी तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पुण्यात बोलताना बंडातात्या कराडकर हे महिला नेत्यांविषयी बोलताना दारु पिऊन बोलत होते, असा गंभीर आरोप केला. कराडकर यांनी माफी मागितली म्हणजे झालं का? असा सवाल त्यांनी केला.

सातारा शहर पोलिस ठाण्यात बंडातात्यांसह 125 जणांवर साथरोग अधिनियमन 3 तसेच 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) व 135 कलमान्वये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी समिंद्रा जाधव यांच्यासह इतर महिलांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून बेताल वक्‍तव्यप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बंडातात्यांविरुध्द कलम 500 व 509 अन्वये आलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करुन घेतला.

बंडातात्यांवर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी स्वत: फलटण येथून सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण सातारा शहर, सातारा तालुका पोलिस व आरसीपी पोलिसांची एक तुकडी पाचारण करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे यासाठी दुपारी 12.30 वाजता पोलिस मुख्यालय परिसरात 100 मीटर अंतरावर दोन्ही बाजूने रस्ता बंद करण्यात आला. या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली.

दुपारी 1 वाजता बंडातात्या सातारा पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली. जाबजबाब, सह्या ही प्रक्रिया राबवण्यात आली. सुमारे सव्वा दोन तास पोलिस बंडातात्यांची चौकशी करत होते. सव्वा तीन वाजता पोलिस ठाण्यातील प्रक्रिया झाल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांना टाळत बंडातात्या कारमधून रवाना झाले. यावेळी बंडातात्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अक्षरश: कानावर हात ठेवले.

बाळासाहेबांची मी माफी मागतो…

कराडचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाबद्दल मी विधान केले आहे ते संपूर्ण विधान निराधार आहे. त्याबद्दल मी वैयक्‍तिक आमदार बाळासाहेब पाटील व त्यांचे चिरंजीव या दोघांची माफी मागतो आहे. बाळासाहेबांचे चिरंजीव तसे आहेत असे माझे अजिबात म्हणणे नाही. उलट ते माझ्यासोबत दिंडीत चालले आहेत. त्यामुळे मी बाळासाहेबांबरोबरच ज्या राजकीय लोकांची आंदोलनावेळी नावे घेतली त्यांच्याबद्दल मला कोणताही पूर्व आकस नाही. तसेच वैयक्‍तिक मी कधी द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल झालेली वक्‍तव्ये अनावधानाने झालेली आहेत. त्याबद्दल मी माफी मागत आहे.

अनेक वर्षांपासून ना. बाळासाहेब व माझे चांगले संबंध आहेत. चाळीस वर्षांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये आजपर्यंत मी बाळासाहेब यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारे कुठेही बोललो नाही हे बाळासाहेबांनाही माहिती आहे. वैयक्‍तिक त्यांचा आणि माझा कोणताही राजकीय व अन्य विरोध नाही. परंतू आंदोलनावेळी बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चुकीचे वाक्य गेले असून त्याबद्दल माफी मागतो. रामकृष्ण हरी, असे सांगत बंडातात्या कराडकर यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्‍त केली.

Back to top button