नाशिक : खरेदीचा आज सुपरसंडे; गणेशोत्सव : तयारी बाप्पाच्या आगमनाची

नाशिक : मुख्य बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी झालेली गर्दी. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : मुख्य बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी झालेली गर्दी. (छाया: हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

श्रावण संपला असून, आता लाडक्या बाप्पाच्या आगमनाची घराेघरी तयारी सुरू झाली आहे. येत्या बुधवारी (दि.३१) नाचत-गाजत बाप्पाचे आगमन होणार असल्याने प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदीसाठी रविवारी बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बाप्पाच्या आगमानपूर्वीच्या तयारीसाठीचा रविवार हा अखेरचा असल्याने, तो खरेदीचा 'सुपर संडे' ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रविवारी बाजारात मोठी उलाढाल होईल, अशी व्यावसायिकांना अपेक्षा आहे.

चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण म्हणजे गणेशोत्सव होय. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असून, बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला यांचा अधिपती असलेल्या गणेशाची प्रतिष्ठापनेपासून पुढील १० दिवस मनोभावे आराधना केली जाते. सध्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेची घरोघरी जल्लोषात तयारी केली जात आहे. दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा मात्र, निर्बंध उठविण्यात आल्याने पुन्हा एकदा गणरायाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी रविवारी (दि.२८) बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या बाजार विविध आकर्षक सजावटीच्या साहित्यांनी सजला आहे. मखर तसेच इतर सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्याने, ते खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. गणरायाच्या आगमनापूर्वीचा रविवार हा खरेदीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुधवारी श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार असल्याने, रविवारी खरेदीचा आनंद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडणार आहेत. दरम्यान, यंदा साहित्याच्या किमतींमध्ये ३० टक्क्यांची वाढ झाल्याने, ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. मात्र दोन वर्षे गणेशोत्सव फारसा उत्साहात साजरा करायला मिळाला नसल्याने, या दरवाढीचा ग्राहकांवर फारसा परिणाम होईल, असे चित्र नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

शनिवारी खरेदीसाठी उसळली गर्दी $ : शनिवारी (दि.२७) शासकीय सुटी असल्याने, अनेकांनी खरेदीचा योग साधला. बाजारात विविध सजावटीचे साहित्य उपलब्ध असून, ते खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. प्लास्टिकबंदी असल्याने कागदी, क्रेपपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानाच्या वेली, विविध लायटिंगची तोरणे उपलब्ध आहेत. लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी आदी विविध रंगांच्या फुलांच्या माळा तसेच हिरव्या वेलीसारख्या माळा खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. ५० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत माळांचे दर आहेत. खऱ्याखुऱ्या टपोऱ्या फुलांप्रमाणे कागदी, क्रेपच्या फुलांचे गुच्छ, ताटवे, कमान यांनाही सजावटीसाठी विशेष मागणी आहे. गणेशमूर्तींच्या मागे सोडलेल्या पडद्यावर मोती, कुंदन, काचेच्या माळा, रंगीबिरंगी फुलांच्या तसेच लायटिंगची तोरणे सोडण्यात येतात. त्यामुळे मखराची शोभा वाढते. या माळा २५ रुपयांपासून अगदी ५०० रुपयांपर्यंत विक्रीला उपलब्ध आहेत. लवंगी, स्ट्रॉबेरी, अ‍ॅपल आदी आकारातील संगीत विद्युत माळाही बाजारात आल्या आहेत. १०० रुपयांपासून ते ४ हजार रुपये किमतीला या माळा उपलब्ध आहेत. फिरती छत्री, फिरते चक्र विक्रीसाठी असून, एलईडी व एलपीजीचे रंगीत दिवे, विविध रंगांचे फोकस मखराची अधिक शोभा वाढवत आहेत.

पूजेच्या साहित्याला मागणी : कापूर, लाल कपडा, धूप, अगरबत्ती, वस्त्र, कुंकू, रांगोळी, तांब्यांचे ताट, विडा सुपारी, कापूस, हार, केळीची पाने, नारळ, गुलाल आदी पूजेच्या साहित्याला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षापर्यंत पाच किंवा दहा रुपयाला हे साहित्य मिळत होते. यंदा मात्र प्रत्येक साहित्य १० रुपये व त्यापेक्षा अधिक दरानेच विकले जात आहे. त्याचबरोबर फळांनादेखील बाजारात मोठी मागणी आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news