‘तिने’ बनवून ठेवले आठ महिन्यांचे जेवण! | पुढारी

‘तिने’ बनवून ठेवले आठ महिन्यांचे जेवण!

लंडन : कालचे अन्न आपल्यासाठी शिळे होत असते, मात्र तेच ‘प्रिझर्व्हड फूड’ असेल तर अनेक दिवस आपण खाऊ शकतो. आता एका पाश्चात्त्य महिलेने घराच्या परिसरातच उगवलेल्या सेंद्रिय भाज्यांपासून पुढील आठ महिन्यांसाठीचे जेवण बनवून ते ‘स्टोअर’ करून ठेवले आहे. यापुढील आठ महिने तिचे कुटुंबीय बाहेरचे कोणतेही अन्न न खाता हेच पोषक अन्न खाणार आहेत.

या महिलेचे नाव आहे केल्सी शॉ. तिने तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी पुढील आठ महिन्यांचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तयार करून ते स्टोअर करून ठेवले आहे. आता ज्यावेळी त्यांना भूक लागते त्यावेळी ते हेच अन्न गरम करून खातात. केल्सीच्या घरातील पँट्री घराच्या परसातच लागवड केलेल्या भाज्यांनी भरली आहे.

याशिवाय या पँट्रीत शिजवलेले अन्न, औषधी वनस्पती, तांदूळ आणि पास्तादेखील स्टोअर करून ठेवला आहे. या ‘सुपर ऑर्गनाईज्ड मॉम’ने तिच्या पँट्रीमध्ये स्टोअर केलेले हे अन्न तिच्यासोबत तिचे कुटुंब पुढील आठ महिने खाणार आहे. तीन मुलांची आई असणार्‍या केल्सीने असे का केले याचे कारणही ‘हटके’ आहे. मुख्य कारण आहे बचतीचे. ही शिस्तबद्ध व काटकसरी महिला प्रत्येक पदार्थ कसा स्टोअर करायचा हे शिकलेली आहे. लोणचं असो किंवा मांस, प्रत्येक पदार्थ कसा ‘स्टोअर’ करायचा याचे शास्त्रशुद्ध तंत्र तिने शिकून घेतले आहे.

अन्न स्टोअर करण्यासाठी तिला तीन महिने लागतात. तिचे कुटुंब उन्हाळ्यात घरातच पिकवलेल्या ताज्या फळभाज्या खातात, पण हिवाळ्यात त्या स्टोअर करून ठेवल्या जातात. हेच स्टोअर केलेले अन्न ते हिवाळा संपेपर्यंत खातात. वर्षभर केवळ घरगुती अन्नच खाल्ले जावे असा तिचा प्रयत्न असतो. सर्व भाज्या घरीच लावण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे कुटुंबाला सकस व ताजे अन्न मिळते व दुसरे म्हणजे पैसेही वाचतात! आपल्या मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात राहावे, अशीही तिची इच्छा असते.

Back to top button