नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपून आठवडा उलटला आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून लॉटरीसाठी अधिकृत तारखेची घोषणा न झाल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. पालकांना आरटीई लॉटरीचे वेध लागले आहेत.
आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. राज्यभरात आठ हजार ८२८ शाळांमध्ये एक लाख १ हजार ९६९ जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरातून तीन लाख ६४ हजार ९९९ पालकांनी अर्ज भरले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यातील चार हजार ८५४ जागांसाठी २२ हजार १२२ अर्ज प्राप्त झाले आहेत. पालकांना अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षण संचालनालायकडून मुदतवाढही दिली होती. आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशप्रक्रियेच्या पुढील टप्प्यात अर्जाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत निवड झालेल्यांना त्यांचा अर्ज भरताना दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळा उपलब्ध करून देण्यात येतील. संबंधित निवड झालेल्या बालकाच्या शाळा प्रवेशासाठी ठराविक कालावधी देण्यात येणार आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी अर्जात दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाणार असल्याचे शालेय शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या आठवड्यात लॉटरी निघणार ?
उपलब्ध जागांच्या तुलनेत यंदा तब्बल साडेतीनपट अर्ज प्राप्त झाल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे. परंतु, त्यात काही डुप्लिकेट, अपात्र, चुकीचे अर्जदेखील आहेत. सध्या 'एनआयसी'मार्फत त्याची पडताळणी सुरू आहे. हे काम पूर्ण होताच ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरावरून सोडत निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील आरटीईची स्थिती अशी…
शाळा : ८,८२८
उपलब्ध जागा : १, ०१,९६९
आतापर्यंत प्राप्त अर्ज : ३,६४,९९९