नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेने १०० वर्षांत विद्यार्थ्यांचवांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शतकपूर्ती वर्षानिमित्त संस्थेतील 5०० शिक्षकांनी प्रत्येकी दोन याप्रमाणे एक हजार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे, या अभिनव उपक्रमाबाबत शिक्षकांचे कौतुक करत संस्थेतील शिक्षक प्रेरणादायी काम करीत आहेत, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले.
येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी या महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्थेने यंदा गौरवशाली परंपरेची १०० वर्षे पूर्ण केली आहेत, त्यानिमित्ताने शतकपूर्ती सोहळ्याचे तथा वर्धापन दिनाचे आयोजन शनिवारी (दि. १) करण्यात आले होते. यावेळी सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळ तसेच शाळा प्रमुखांशी संवाद साधताना प्रा. रहाळकर बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, कार्यकारी मंडळ सदस्य चंद्रशेखर वाड, विश्वास बोडके, सरोजिनी तारापूरकर, मैथिली गोखले, मोहन रानडे, ॲड. जयदीप वैशंपायन, राजा वर्टी, सुरेश राका, अलका शिंदे उपस्थित होते. कार्यवाह राजेंद्र निकम यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर शिक्षक मंडळ सदस्य दिलीप अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक मंडळ अध्यक्ष प्रियंका निकम, उपाध्यक्ष नरेंद्र मोहिते तसेच विजय मापारी, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
नाशिक एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचा १०० वा वर्धापन दिन सर्व शाळांत शनिवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व शाळा पताका तोरण आकर्षक रांगोळ्या व गुढ्या उभारून सुशोभित करण्यात आल्या होत्या. शाळा समिती अध्यक्ष तसेच पालक शिक्षक संघ व शाळा पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.