बेळगावात नुसती लाहीलाही … !, गरिबांच्या महाबळेश्वरात पारा ३६ अंशांवर | पुढारी

बेळगावात नुसती लाहीलाही ... !, गरिबांच्या महाबळेश्वरात पारा ३६ अंशांवर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावचा पारा ३६ अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे जीवाला थंडावा देण्यासाठी ग्राहकांचे पाय शहाळे, लिंबू सरबत, फळांचा रस, उसाचा रस पिण्याकडे वळत आहे. शिवाय थंड पाण्यासाठी मातीचे माठ खरेदी करण्याकडेही कल आहे.

बेळगावचे तापमान दोन आठवड्यापासून वाढले असून सकाळी ३३, दुपारी ३६ पर्यंत पोचले आहे. मात्र सायंकाळी १८ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. दिवसभर उष्ण आणि सायंकाळी व पहाटे वातावरणात गारवा निर्माण होत असल्याने आजारी पडण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली तोड तापमानवाढीचे मुख्य कारण आहे. आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाजारात रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसत आहे.

उन्हामुळे अंगाची काहिली होऊ लागली एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक असून उन्हाचा तडाखा असाच वाढत गेल्यास आजारांची तीव्रता आणि पाण्याची टंचाई वाढण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. सध्या बेळगाव शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागही पाणीटंचाईला समोरा जात आहे. लवकर पाऊस झाला नाही तर सर्वत्र पाणीबाणी निर्माण होणार आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. जलाशयामध्ये पाणी घटले आहे.

शहाळे पिण्याकडे कल

तहान भागवण्यासाठी शहाळे पिण्याकडे ग्राहकांचे पाय वळत आहेत. मंगळूर, दावणगिरी, धारवाड येथून शहाळी बेळगावात मागवली जातात. रस्त्यांशेजारी शहाळे विक्रेते ठाण मांडून बसले आहेत. २० ते ३० रुपयांना एक शहाळे विकले जात आहे.

मातीच्या माठांना मागणी

उन्हाळ्यात फ्रीजमधील पाणी पिल्याने सर्दी, पडसे आजार होत असल्याने अनेक जण मातीच्या माठांतील पाणी पिण्यावर भर देत आहेत. त्यामुळे शहरात माठ खरेदी जोमात सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान, खानापूर येथून मातीचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. २५० ते ७०० रुपयांपर्यंत माठांचे दर आहेत.

फळांच्या रसांना मागणी

तहान भागवण्यासाठी कोड्रिंक न पिता फळांचा रस पिण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे लिंबू, सफरचंद, उस, अननस, आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू या फळांचा रस पिण्यासाठी मागणी वाढत आहे. २० ते ५० रुपये प्रती ग्लास दर आहे. तहान भागविण्यासाठी उसापासून काढलेला ताजा रस पिण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. त्याबरोबर अलेपाक भेळचादेखील आस्वाद घेत आहेत. बिहारी बाबू मोठ्या प्रमाणात बेळगाव खानापुरात दाखल झाले असून रस्त्याशेजारी दुकाने थाटून स्थानिक शेतकऱ्यांकडून उस खरेदी करून व्यवसाय करत आहेत. २० रुपये प्रती ग्लास उसाचा दर आहे.

 

Back to top button