नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरातील वनस्पती, वृक्षांची माहिती एका क्लिकवर क्यूआर कोडद्वारे उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या क्यूआर कोडद्वारे सर्वसामान्यांना वनस्पतींचे औषधी महत्त्व व माहिती मिळविण्यास उपयुक्त ठरणार आहे.
आरोग्य विद्यापीठ परिसरात रौप्यमहोत्सवी वर्षात विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांना जिओ टॅगिंग व क्यूआर कोड लेबल लावण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ कुलगुरू लेफ्टनंन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजीव कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठ परिसरला भेट देणारे अभ्यागत व विद्यार्थ्यांना वनसंपदेची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने क्यूआर कोड तयार करण्यात आले आहेत. स्मार्ट फोनद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर जिओ टॅगिंगद्वारे वनस्पती, वृक्षाचे स्थान, वनस्पतीचे शास्त्रीय नाव, मराठी नाव, परिसरातील वनस्पतींची संख्या, औषधी महत्त्व आदी माहिती उपलब्ध होणार आहे. डॉ. प्रदीप आवळे व रत्नाकर काळे यांनी क्यूआर कोडबाबत पुढाकार घेतला. हर्बल गार्डनची देखभाल करणारे नंदू सोनजे आणि संतोष केदार यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. सुबोध मुळगुंद, श्रीधर चितळे, डॉ. उदयसिंह रावराणे, संजय मराठे, ड. संदीप कुलकर्णी, डॉ. स्वप्निल तोरणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बजाज इले. फाउंडेशनकडून 6,200 रोपे प्राप्त
विद्यापीठातील 'हर्बल गार्डन'मध्ये विविध प्रकारच्या वनस्पती व वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठास 6 हजार 200 रोपे बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनने सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिली. त्यामध्ये पेरू, जांभूळ, कांचन, बकुळ, चिकू, आवळा, अर्जुन, सीताफळ, करंज, सप्तपर्णी, फणस, बदाम, चित्रक, कुपी आदी रोपांचा समावेश आहे.