नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत.
नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा जप्त केला आहे. बुधवारी (दि.11) रात्री 8 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलिसांनी बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास नाणेगाव चौफुलीजवळ कारवाई करीत सागर घुले (29, रा. कोटमगाव) यास पकडले. सागरकडून पोलिसांनी तीन हजार 150 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. तर सायंकाळी 7.30 च्या सुमारास जेलरोड येथील मोरे मळा परिसरातील मोकळ्या जागेत नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करीत 1,260 रुपयांचा अवैध देशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी गणेश विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकलहरे रोड : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने एकलहरे रोडवरील भाजीपाला मार्केटजवळ कारवाई करीत सन्नी जाधव (27, सिन्नर फाटा) यास पकडले. सन्नीकडून 4, 550 रुपयांचा अवैध देशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सन्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (दि.11) सकाळी 11.30 च्या सुमारास सातपूरमधील केवल पार्क येथे कारवाई करीत 14 हजार 65 रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. संशयित रमेश चाटे (46, रा. विराटनगर, अंबड लिंक रोड) याच्या ताब्यातून पोलिसांनी हा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी चाटेविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : आडगाव पोलिसांनी केवडीबन परिसरात बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अर्जुन चव्हाण (32, रा. वाघाडी), महावीर कौलकर (47, रा. वाल्मीकनगर) व बेवडा बाबा अशा तिघांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तिघांकडून 60 हजार रुपयांची हातभट्टीची दारू जप्त केली आहे. संशयित हातभट्टीची दारू दोन रबरी ट्यूबमध्ये भरून दुचाकीवरून नेताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तिघांविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी लॅम रोडवर कारवाई करीत पंकज आडके (39, रा. लॅम रोड) याच्याकडून 980 रुपयांचा अवैध देशी मद्यसाठा जप्त केला आहे. तर नानेगाव येथील कारखाना रोडवर गणेश शिंदे (33) याच्याकडून 910 रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पंकज व गणेश विरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पंचवटी पोलिसांनी वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी कारवाई करीत महिलेकडून 1, 610 रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला.
हॉटेल चालकांना फक्त तंबी
एकीकडे शहर पोलिसांकडून अवैधरीत्या मद्यसाठा व विक्री करणार्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, शहरातील काही हॉटेलमध्ये पार्सल सुविधा उपलब्ध असून, त्या हॉटेलवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. हॉटेलचालकांना फक्त तंबी देत पार्सल सुविधा न देण्यास सांगितले जात आहे. मात्र, चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर हॉटेलमध्ये पुन्हा मद्यपींच्या बैठका झडतात. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका आणि हॉटेलचालकांना मुभा असाच काहीसा प्रकार शहरात दिसत आहे.