जांबूतला धोकादायक वळणावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही | पुढारी

जांबूतला धोकादायक वळणावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

पिंपरखेड(ता.शिरूर); पुढारी वृत्तसेवा : जांबूत  गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात चारचाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघात झाला. ही घटना बुधवारी (दि.11) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातातील वाहन चोंभूत (ता.पारनेर)मार्गे जांबूतकडे येत असताना हा अपघात झाला. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, संतोष जोरी, शांताराम जोरी, अजय जोरी, संजय जोरी आदींनी घटनास्थळी धाव घेत चालकासह वाहन बाहेर काढण्यास सहकार्य केले. संबंधित घटनास्थळावर दोन महिन्यांपूर्वी तवेरा आणि वेगनार कारचा अशाचप्रकारे अपघात झाला होता.

आतापर्यंत सुमारे पाच ते सहा दुचाकी अपघातात अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. नुकतेच या रस्त्याचे डांबरीकरण झाले असून, या ठिकाणी असणार्‍या धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने वारंवार अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत. घटनांचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणी योग्य सूचना फलक लावावेत तसेच विशिष्ट अंतरावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button