वाल्हा-मांडकी-वीर रस्त्याला 10 कोटी मंजूर : विजय शिवतारे | पुढारी

वाल्हा-मांडकी-वीर रस्त्याला 10 कोटी मंजूर : विजय शिवतारे

सासवड; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील वाल्हा-मांडकी-वीर रस्त्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे. यातून तब्बल 8.7 किलोमीटर रस्त्याचे काम केले जाणार आहे, असे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. बर्‍याच वर्षांच्या खंडानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पुरंदर तालुक्याला निधी मिळाला आहे. यापूर्वी सन 2014 साली शिवतारे यांनी भिवरी ते गराडे या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून केले होते. सन 2007 नंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पुरंदर तालुक्याला केवळ तेवढाच एकमेव रस्ता मिळाला असल्याचेही शिवतारे  यांनी सांगितले.

या रस्त्याच्या माध्यमातून वाल्हे, हरणी फाटा, मांडकी, धुमाळवाडी, घोडेउड्डाण देवस्थान आणि वीर ही गावे जोडली जाणार आहेत. या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते.
मधल्या काळात या रस्त्याच्या अवस्थेवरून एक व्हिडिओदेखील सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करीत ग्रामस्थांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले होते. मात्र, शिंदे -फडणवीस सरकारने केंद्राकडे प्राधान्याने या रस्त्यासाठी मागणी केल्याने हा प्रश्न आता सुटणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. त्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
आभार मानले.

जेजुरी-कोथळे-राजेवाडी रस्ताही होणार?
पुरंदर तालुक्यातील जेजुरी, धालेवाडी, कोथळे, भोसलेवाडी, पिसर्वे आणि राजेवाडी या गावांना जोडणारा रस्ताही लवकरच पूर्णपणे या योजनेतून घेतला जाणार आहे. या रस्त्याचे जवळपास 14.5 कि.मी.चे डांबरीकरण केले जाणार असून, त्यासाठी 12 कोटी निधीची तजवीज केली जाणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले.

Back to top button