नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर गावातील जकात नाका परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या संशयितांची गंगापूर पोलिसांनी चांगलीच नशा उतरवली. ताेडफाेड करणाऱ्या पाच जणांना गंगापूर गाव परिसरातून कान पकडून फिरविले. तसेच 'कारच्या काचा फाेडणार का रे?', 'दहशत करणार का?' 'याच्यापुढे अशी चुकी करणार का,' असे प्रश्न विचारले, त्यावर 'नाही सर' हे उत्तर मोठ्याने देत संशयितांनी मान खाली घातली. त्यामुळे ज्या परिसरात दहशत केली त्याच परिसरात कान पकडून, मान खाली घालून वरात निघाल्याने संशयितांची दहशत मोडल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
गंगापूर गावात १३ फेब्रुवारीला रात्री १०.३०च्या सुमारास टोळक्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करीत दहशत केली होती. संशयिताने एकावर चाकूने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जय गजभिये यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तपास करीत अनिकेत ऊर्फ अंड्या पप्पू शार्दुल (१९, रा. गोवर्धन गाव), प्रतीक जाधव (१९), विजय खोटरे (१९, दोघे रा. शिवाजीनगर), कपिल ऊर्फ चिंटु गांगुर्डे (२१) व रोहित वाडगे (१९, दोघे रा. गंगापूर गाव) यांना पकडले. इतर संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या संशयितांची दहशत मोडून काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी गंगापूर गावातून धिंड काढली. तसेच भविष्यात असे कृत्य करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला. यावेळी उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रहेरे, नाईक मच्छिंद्र वाकचौरे, सोनू खाडे, गोरख साळुंके, भागवत थविल यांचे पथक उपस्थित होते.